माणसाचा प्रामाणिक मित्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कुत्र्यांवर अनेकजण अगदी जीवापाड प्रेम करतात. आपल्याला लहान बाळाला सांभाळावं तसं कुत्र्यांचं संगोपन केलं जातं. बोलता येत नसल्याने लहान मुलांच्या अनेक गोष्टींविषयी आपल्याला माहित नसतं तसाच काहीसा प्रकार हा या मूक प्राण्यांबाबतही घडतो. एखाद्या परिस्थितीत आपले पाळीव डॉग नेमके काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असतात पण आपल्याला तात्यांचा संकेत कळू शकत नाही. किंवा अनेकदा त्यांच्या एखाद्या सवयीचा उलगडा होत नाही. आज आपण कुत्र्यांची अशीच एक सवय व तिच्यामागचं कारण जाणून घेणार आहोत.
तुम्ही अनेकदा पाहिलं असेल आपण कुत्र्यांना घरात ठेवण्यासाठी टॉयलेट ट्रेन करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजेच काय त्यांनी घरभर कुठेही घाण करून ठेवू नये एक ठिकाण नेमून देण्याचा आपला प्रयत्न असतो पण तरीही कुत्रे बहुतांशवेळा घराच्या कपाटावर किंवा गाडीच्या टायरवर लघवी करतात. डॉग एक्सपर्टच्या माहितीनुसार कुत्रे आपले क्षेत्र म्हणजेच टेरिटरी मार्क करण्यासाठी असं करत असल्याचे म्हटले जाते. इतकंच नव्हे तर याच गंधातून कुत्र्यांनी जोडीदार किंवा मित्रांसाठी पाठवलेला हा संकेत असतो.
आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कुत्रे बहुतांश वेळा उभ्या गोष्टींवरच का लघवी करतात. कुत्र्यांना उभं राहिल्यावर न वाकता किंवा बसता ज्या उंचीपर्यंत वास घेता येतो तितक्या उंचीवर ते लघवी करतात. शिवाय जमिनीवर पाण्याने किंवा धुळीने हा गंध काही वेळाने नाहीसा होऊ शकतो पण धातूचे खांब किंवा रबरी टायरवर गंध अधिक काळ तसाच राहतो. म्हणूनच थेट जमिनीवर लघवी न करता कुत्रे खांब, गाडीचा उंच टायर, कपाट इत्यादी उभ्या गोष्टींवर/वस्तूंवर लघवी करतात.