
दापोली- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल आज, शुक्रवारी ऑनलाईन पध्दतीने जाहीर झाला. यंदाही दहावीच्या निकालामध्ये कोकण मंडळाने राज्यात पुन्हा एकदा अव्वल स्थान पटकाविले आहे. कोकण विभागाचा निकाल ९८.११ टक्के लागला आहे. तर कोकण बोर्डात मनीष महेश कोकरे याने प्रथम क्रमांक मिळवला आहे.
मनीषला स्पर्धा परीक्षेची गोडी लागली असून त्याचे भविष्यात आयएएस अधिकारी बनायचं ध्येय ठरलं आहे. मनीषचे वडील महेश कोकरे आदर्श जिल्हा परिषद शिक्षक आहेत. तर आई गृहिणी आहेत. मनीषला अगदी बालपणापासूनच शिक्षणाची गोडी निर्माण करण्यात आई वडिलांना यश आले. पहिल्या वर्गापासून नववी पर्यंत मनीष अव्वल राहिला, आणि आता 10 वीत चक्क कोकण बोर्डात पैकीच्या पैकी गुण घेवून प्रथम आला आहे.
त्याच्या यशात ज्ञानदीप विद्यामंदिरचे शिक्षक, आई वडील यांचा मोलाचा वाटा आहे. दापोलीच्या इतिहासात पहिल्यांदाच विद्यार्थी बोर्डात येण्याचा बहुमान कोकरेने मिळाला आहे.आपल्या यशात शाळेतील सर्व शिक्षक, आई-वडिल यांचा सिंहाचा वाटा असून यापुढे दहावी प्रमाणेच बारावीतही यश संपादन करण्याचे ध्येय आहे. बारावीनंतर वैद्यकीय शिक्षण करण्याचा मानस असून त्यानंतर मात्र आयएएसची तयारी सुरू ठेवणार असल्याचे मनीषने सांगितले.