छ.संभाजीनगर:- बारावीच्या ३७२ विद्यार्थ्यांच्या उत्तर पत्रिकेवरील दोन वेगवेगळ्या हस्ताक्षराप्रकरणी शिक्षण मंडळाने नेमलेल्या चौकशी समितीने प्रथमदर्शनी मुलं दोषी नसल्याचे सांगत आज अखेर त्यांचा निकाल जाहीर केला आहे. बोर्डाकडून सोयगाव तालुक्यातल्या फरदापूर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार देण्यात आली होती. याप्रकरणी इतर दोषींवर आता गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.
१५ मे नंतर बोर्डासमोर केंद्रप्रमुख, केंद्रसंचालक, कस्टडियन, पर्यवेक्षक मॉडरेटर आदींची चौकशी झाली होती.दरम्यान या काळात सदर उत्तर पत्रिकेमध्ये दुसरे हस्ताक्षर आपले नसल्याचे विद्यार्थ्यांनी लेखी उत्तर बोर्डाकडे सादर केले होते. सदर उत्तरपत्रिका सोयगाव तालुक्यातील दोन शिक्षकांकडे गेल्याची माहिती समोर आली आहे. त्यानुसार संबंधित पोलीस ठाण्यात या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
दरम्यान आता पोलीस तपासातच हे दुसरे हस्ताक्षर कोणाचे आहे? यात काही आर्थिक व्यवहार झाला आहे का? यात प्रामुख्याने कोणती संस्था, कोणते शिक्षक अथवा अधिकारी गुंतलेत आहेत का? संपूर्ण प्रकाराला जबाबदार कोण? अशा सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील.