
मुंबई- दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी काल ममता बॅनर्जी यांची भेट घेतल्यानंतर आज मुंबई गाठली आणि त्यानंतर थेट मातोश्री गाठत उद्धव ठाकरेची भेट घेतली.त्यांच्या या भेटी मागे एक महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे दिल्लीबाबत केंद्र सरकारने काढलेला अध्यादेश.
हा अध्यादेश काय आहे हे पाहूयात-
दिल्लीमध्ये अधिकाऱ्यांच्या पोस्टिंगमध्ये राज्य सरकारलाही वाव देणारा आदेश सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठानं ११ मे रोजी दिला होता. पण केंद्र सरकारने अवघ्या आठ दिवसात अध्यादेश आणत हा निकालच रद्दबातल केला. दिल्ली हे पूर्ण राज्य नाही. त्यामुळे इथे केंद्रच सुप्रीम असलं पाहिजे असं म्हणत या केंद्राने या अध्यादेशात सगळे अधिकार पुन्हा उपराज्यपालांकडे दिले आहेत.
आता कुठलाही अध्यादेश काढल्यानंतर तो सहा महिन्यांत संसदेत मंजूर करुन घ्यावा लागतो आणि अवघ्या काही दिवसांवर पावसाळी अधिवेशन आल्याने हा अध्यादेश संसदेत पारित करण्यासाठी सर्व खासदारांसमोर ठेवण्यात येणार आहे.हा अध्यादेश पारित होऊ नये,तसंच याला विरोध व्हावा यासाठी अरविंद केजरीवालांनी देशातील भाजप विरोधकांच्या गाठीभेटी घेण्यासाठी सुरूवात केली आहे.याच धर्तीवर आज त्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आणि उद्या ते शरद पवारांच्या भेटीला जाणार आहेत.