मुंबई :- अधिकारी, कर्मचारी नोकर भरती करावी, नव्या कर्मचाऱ्यांना जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करावी, आठवड्यातून पाच दिवस काम, निवृत्तीवेतन योजना अद्ययावत करावी अशा विविध मागण्यांसाठी बँक ऑफ महाराष्ट्र आणि बँक ऑफ इंडिया या दोन बँकांच्या कर्मचाऱ्यांनी आज (शुक्रवार २७ जानेवारी) देशव्यापी संपाची हाक दिली आहे.
डेप्युटी चीफ लेबर कमिशनर यांनी तडजोडीसाठी बोलावलेली बैठक निष्फळ ठरल्याने बँक ऑफ महाराष्ट्रचा देशव्यापी संप आजपासून (शुक्रवारी ता. २७) सुरु झाला आहे. गेल्या ९ ते १० वर्षात जवळपास ४५० नवीन शाखा उघडल्या, बँकेचा व्यवसाय अडीच पटीने वाढला पण कर्मचाऱ्यांची संख्या २० टक्के कमी झाली. त्याचबरोबर राजीनामा, निवृत्ती, मृत्यू आदी कारणांमुळे रिक्त झालेल्या जागाही भरण्यात आल्या नाही. अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना आपल्या कामाच्या तासांपेक्षा जास्त वेळ काम करावे लागते. रजा मिळत नाही, हक्काच्या सुट्टी दिवशीही कामावर कार्यरत रहावे लागते. अशा पार्श्वभूमीवर युनायटेड फोरम ऑफ महा बँक युनियनकडून एक परिपत्रक काढत कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे.
बँकांच्या कर्मचाऱ्यांच्या मागण्या संदर्भात आज एका बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. जर ही बैठक यशस्वी झाली नाही तर बॅंक ऑफ महाराष्ट्र २७ जानेवारी ते ३१ जानेवारीपर्यंत बंद राहण्याची शक्यता आहे. म्हणजे पाच दिवस हा संप सुरु राहील.