उरण दि. १७ (विठ्ठल ममताबादे) रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील विविध गावातील गावठाण विस्ताराचा प्रश्न मोठा गंभीर असून नागरीकांची ही समस्या सोडविण्यासाठी ‘शेतकरी प्रबोधिनी’ या शेतकरी कामगार प्रकल्पग्रस्तांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या सामाजिक संघटनेने पुढाकार घेतला आहे. उरण तालुक्यातील चाणजे ग्रुपग्रामपंचायत हद्दीतील बालई काळा धोंडा येथील राहत्या घरांना सनद (प्रॉपर्टी कार्ड) मिळावे व त्यासाठी चाणजे ग्रुप ग्रामपंचायत मार्फत पुढील कार्यवाही करण्यात यावी या अनुषंगाने बालई काळाधोंडा येथील ग्रामस्थांनी शेतकरी प्रबोधिनीचे संस्थापक अध्यक्ष राजाराम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामविकास अधिकारी रामकृष्ण म्हात्रे यांची भेट घेउन सविस्तर चर्चा केली. यावेळी बालई काळाधोंडाच्या ९२ ग्रामस्थांनी प्रॉपर्डी कार्ड मिळावे यासाठी ग्रामपंचायती मध्ये अर्ज दाखल केले.
बालई काळाधोंडा ग्रामविकास परिषदेने लोकवर्गणी काढून मूळ गावठाण २ एकर विस्तारित गावठाण १२० एकर एकूण गावठाण १२२ एकर याचा नकाशा तयार करुन शासनास तो सादर केला आहे. त्याचबरोबर अत्यंत जागरुक नागरिकांनी एकूण १०० प्रॉपर्टीकार्डचे प्रस्ताव स्वतः तहसिल उरण आणि भूमिअभिलेख उरण यांच्याकडे सादर केले आहेत. तशाच प्रकारचे ९२ प्रस्ताव ग्रुप ग्रामपंचायत चाणजे मध्ये दाखल करण्यात आले आहेत.बालईतील एकूण घरांची संख्या ११११ एवढी आहे. केवळ १० टक्के लोकांचेच हे अर्ज आहेत.
अजून इतर लोकांचे अर्ज टप्प्या टप्प्याने ग्रुप ग्रामपंचायत चाणजे मध्ये देण्यात येणार आहे. अशी माहिती राजाराम पाटील यांनी यावेळी दिली.शेतक-यांची, जमीन मालकांची, ग्रामस्थांची बाजू राजाराम पाटील यांनी मांडून प्रॉपर्टी कार्ड नागरिकांना किती महत्वाचे आहे हे ग्रामविकास अधिकारी रामकृष्ण म्हात्रे यांच्या निदर्शनास आणून दिले. राजाराम पाटील व शेतक-यांची बाजू ऐकून घेउन जमीन मालक, शेतकरी ग्रामस्थ यांना योग्य ते सहकार्य करण्याचे आश्वासन ग्रामविकास अधिकारी रामकृष्ण म्हात्रे यांनी दिले .
ग्रामपंचायत मध्ये बालई काळाधोंडा ग्रामस्थांना प्रॉपर्टी कार्ड मिळावे यासाठी मासिक सभेत ठरावही घेण्यात आल्याचे ग्रामविकास अधिकारी रामकृष्ण म्हात्रे यांनी सांगितले. बालई काळाधोंडा ग्रामस्थांना चांगले सहकार्य केल्या बद्दल सरपंच अमित भगत,ग्रामविकास अधिकारी रामकृष्ण म्हात्रे, सर्व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे यावेळी बालई ग्रामस्थांनी आभार मानले.
या कामी चाणजे ग्रुप ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य बबन चव्हाण, शेतकरी प्रबोधिनीचे संस्थापक अध्यक्ष राजाराम पाटील, बालई काळाधोंडा ग्रामविकास परिषदेचे सचिव रविंद्र चव्हाण तसेच बालई काळाधोंडा ग्रामविकास परिषदेच्या सर्व पदाधिकारी सदस्यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. गावठाण विस्ताराचे कार्य रायगड जिल्ह्यात राजाराम पाटील यांच्या माध्यमातून मोठया प्रमाणात सुरु असून दिवसेंदिवस हि चळवळ अधिक व्यापक होताना दिसून येत आहे.