
शनिवारपर्यंत खड्डे भरण्याचे निर्देश; दर शनिवारी महामार्गाची पाहणी करणार…
चिपळूण : मुंबई-गोवा महामार्गाच्या एकूण ३५५ किलोमीटर चौपदरीकरण प्रकल्पातील ३३४ किलोमीटरचे काम पूर्ण झाले असून, एकूण ९३.१८ टक्के काम पूर्णत्वास गेले आहे, तर केवळ २१.१९ किलोमीटरचे काम अद्याप प्रगतीपथावर आहे. हे उर्वरित कामही यावर्षी पूर्ण केले जाईल, असे आश्वासन पालकमंत्री उदय सामंत यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिले.
चिपळूण शहरप्रमुख उमेश सकपाळ यांच्या संपर्क कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत पालकमंत्री बोलत होते. या वेळी तहसीलदार प्रवीण लोकरे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विनोद झगडे, महिला आघाडीच्या प्राजक्ता टकले तसेच शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
खड्डे भरून गणेशोत्सवासाठी सुरळीत वाहतूक पालकमंत्री सामंत पुढे म्हणाले की, गणेशोत्सव काळात वाहतूक सुरळीत राहावी, यासाठी शनिवारपर्यंत महामार्गावरील खड्डे भरण्याचे स्पष्ट निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यांनी स्वतः वाहनाने रत्नागिरी ते चिपळूण प्रवास करून मार्गाची पाहणी केली असून, आरवली ते कांटे या रखडलेल्या भागात काही खड्डे असल्याचे निदर्शनास आले. त्या खड्ड्यांचे मोजमाप घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना व ठेकेदारांना तातडीचे आदेश दिले आहेत.
महामार्गाच्या कामात कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी दर शनिवारी चिपळूण येथे येऊन महामार्गाची पाहणी करण्याचे नियोजन पालकमंत्र्यांनी जाहीर केले. त्याचबरोबर संगमेश्वर बसस्थानकासमोरील टपऱ्यांमुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीचा प्रश्न समजून घेत त्यावर उपाययोजना करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
महामार्ग सुरळीत सुरू व्हावा, यासाठी प्रशासन सतर्क असून, नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहनही या वेळी पालकमंत्र्यांनी केले.

संगमेश्वर मधील ट्रॅफिक समस्या सोडवण्यासंदर्भात नागरिकांची चर्चा…
मुंबई गोवा हायवे संदर्भात पाहणी करण्यासाठी उदय संबंध हे संगमेश्वरला संध्याकाळी भेट दिली. व्यापारांचे म्हणणे ऐकून घेऊन त्यासंदर्भामध्ये उपाययोजना करण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. संगमेश्वर व्यापारी संघाच्या आणि ग्रामस्थ यांच्या संगमेश्वर बसस्थानका बाहेरच्या समस्या सोडवण्यासाठी केलेल्या मागणीनुसार रस्त्याच्या अधिकाऱ्यांना सर्व कामे वेळेत करण्याच्या सूचना दिल्या. रस्ता शेजारील गटारे, दोन्ही बाजूनी सर्व्हीस रोड, भाजीगल्ली मध्ये जाण्यासाठी सुसज्ज पायऱ्या, आणि ट्रॉफिक च्या समस्या व्यापारी आणि ग्रामस्थ यांनी पालकमंत्री यांच्याकडे मागणी केली. त्यानुसार कारवाई करण्यात आली. लवकरच कामे पूर्ण करून घेऊ असे आश्वासन पालकमंत्री यांनी दिले.
संगमेश्वर येथिल श्री. दिलीप शेठ रहाटे, श्री. मनोहर गिते, दादु शेठ भिंगार्डे, संत्या खातू, मंदार खातू, संतोष पवार, परवेज मणेर, खापरे, बाबु सप्रे, पिंट्या चव्हाण, उमेश कोतवडेकर आणि ग्रामस्थ हे हजर होते.