चिपळूणमधील जिल्हा न्यायालयात लोक अदालतीस प्रतिसाद ; प्रलंबित प्रकरणात ८८ लाखांची वसुली…

Spread the love

जनशक्तीचा दबाव न्यूज | रत्नागिरी | सप्टेंबर ११, २०२३.

जिल्हा न्यायालय चिपळूण येथे झालेल्या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये ४८७ पैकी ११३ प्रलंबीत दिवाणी व फौजदारी प्रकरणात एकूण रक्कम रुपये ८७ लाख ९७ हजार ९६३ इतक्या रकमेची तडजोड होवून प्रकरणे निकाली निघाली. तसेच १७ वादपूर्व प्रकरणात रक्कम रुपये ६२ हजार ८५० इतक्या रकमेची तडजोड होवून वसुली झाली. पक्षकारांच्या वेळेचा व पैशाचा अपव्यय टळला.

राष्ट्रीय लोकअदालत ९ सप्टेंबर रोजी चिपळूण येथे पार पडली. चिपळूण शहराचा भौगोलिक दृष्टया विचार करता आज प्रचंड पाऊस असून देखील पक्षकारांनी व वकीलवर्गाने मोठ्या संख्येने उपस्थिती दाखवून लोकअदालतीमध्ये महत्वाची भूमिका पार पाडली. या लोकअदालतीमध्ये प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालय व जिल्हा न्यायालय येथील एकूण ४८७ प्रलंबीत प्रकरणे व १८४८ वादपूर्व प्रकरणे ठेवण्यात आली होती. यामध्ये विविध बँका, पतसंस्था, महाराष्ट्र राज्य विदयुत कंपनी, इतर वित्तीय संस्था आणि नुकसान भरपाईचे अर्ज तसेच कौटुंबिक हिंसाचाराची व पोटगीची प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यासाठी न्यायाधीश व वकीलांचे तीन पॅनेल कार्यरत होते. या लोकअदालतीचे कामकाज जिल्हा न्यायाधीश डॉ. अनिता नेवसे, प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्री. कुलकर्णी व श्री. काळे तसेच पॅनेल विधीज्ञ श्री. नितीन सावंत, श्रीमती नयना पवार व श्री. रोहन बापट, चिपळूण यांनी पाहिले.

या लोकअदालतीकरिता चिपळूण वकील संघ, तसेच वकील संघाचे ज्येष्ठ विधीज्ञ श्री.यादव, श्री.रेळेकर, श्री.केळकर, श्री.चिकटे, श्री. दलवाई, श्री.तावडे, श्री. पालांडे, श्री. पाटील, सरकारी वकील, पोलीस कर्मचारी व न्यायालयीन कर्मचारी यांनी उपस्थित राहून तालुका विधी सेवा समिती चिपळूण यांना सहकार्य केले. अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश डॉ. नेवसे यांनी सर्वांचे आभार मानले.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page