नॅशनल हायवेच्या कामात भ्रष्टाचार खोटी बिले बनवून एमआयडीसी, निधी ढापला
मुंबई, दि. २० ( सुनील महाकाळ) – ‘मिंधे’ सरकारमधील मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप होत असताना उद्योगमंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरीत तब्बल ८० कोटींचा ‘डांबर घोटाळा’ केल्याचे समोर आले आहे. ‘मे. आर. डी.सामंत कन्स्ट्रक्शन प्रा. लि.’ कंपनीच्या माध्यमातून वडील आणि भावाच्या संगनमताने खोटी बिले बनवून ‘एमआयडीसी’,’पीडब्लूडी’ आणि नॅशनल हायवेच्या कामात हा भ्रष्टाचार केला आहे. माहित अधिकारातून मिळालेल्या माहितीतून हा घपला समोर आला आहे.
रत्नागिरीचे माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर यांची मुंबईमध्ये पत्रकार परिषद
रत्नागिरीचे माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर यांनी आज मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. उदय
सामंत गेल्या काही वर्षांपासून रत्नागिरीतील शासकीय कामांत अनेक कंत्राटे मिळवून मोठ्या
प्रमाणात भ्रष्टाचार करीत असल्याचा आरोप यावेळी कीर यांनी केला. शासकीय कामे मर्जीतील
ठेकेदारांना देण्यासाठी सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी धरून हा भ्रष्टाचार सुरू आहे. विशेष
म्हणजे, वर्षानुवर्षे मर्जीतील आणि ठरावीक ठेकेदारांनाच कंत्राटे मिळत आहेत. यासाठी ठरावीक कंत्राटदारांचा ग्रूप तयार करून नव्या कंत्राटदारांना दमदाटी करून दबाव आणला जात आहे आणि मर्जीतील ठेकेदारांना काम देऊन भ्रष्टाचार, दर्जाहीन कामे केली जात असल्याचेही यावेळी कीर म्हणाले. या पत्रकार परिषदप्रसंगी अशोक नाचणकर उपस्थित होते.
या भ्रष्टाचाराबद्दल मंत्री उदय सामंत आणि संबंधित शासकीय अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा,अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
नैतिक जबाबदारी म्ह⁴णून उदय सामंत यांनी ताबडतोब राजीनामा द्या
पालकमंत्री उदय सामंत यांनी केलेल्या कोट्यवधीच्या
घोटाळ्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्याच्या मुख्य सचिवांकडे तक्रार करून पुरावेही सादर केल्याचे यावेळी कीर म्हणाले. त्यामुळे या सर्व प्रकरणांची तातडीने सखोल चौकशी करावी आणि उदय सामंत यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून ताबडतोब राजीनामा द्यावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
असा झाला घोटाळा…
टेंडरमधील अटी-शर्तीनुसार जेव्हा अभियंता डांबराचा वापर दाखवतो त्याच वेळी ठेकेदाराने दिलेल्या ओरिजिनल बिलावर क्रॉस करून, कार्यालयाचा सही-शिक्का मारून त्याची झेरॉक्स ठेकेदाराला परत द्यायची असते. मात्र ठेकेदाराला ओरिजिनल बिले क्रॉस न करता
आणि सही-शिक्का न मारता देण्यात आली. ठेकेदाराने याच बिलांचा गैरवापर दुसऱ्या कामांसाठी करून कोट्यवधी रुपये हडपले.यामध्ये एकाच बिलाची रक्कम अनेक वेळा
घेतली गेली आणि ठेकेदाराने आयकरही बुडवला आहे.