पंढरपूर- पंढरपूरच्या आषाढी वारीच्या काळात विठ्ठलाच्या खजिन्यात तब्बल 8 कोटी 34 लाखांचं दान आलं आहे. विशेष म्हणजे गतवर्षीच्या तुलनेत यंदा दोन कोटीचं वाढीव दान आहे. यामध्ये विठ्ठलाच्या चरणावर तब्बल 77 लाख रुपये दान करण्यात आलं आहे. तर लाडू प्रसाद विक्रीतून 98 लाखाचं दान आलं आहे. सोनं आणि चांदी यांचे दान जवळपास दोन कोटी 50 लाखांच्या घरात आहे.
देणगी पावत्यांच्या स्वरुपात जवळपास तीन कोटी लाख 82 लाख रुपये दान करण्यात आले आहे. इतर योजनांमधूनही दान आलं आहे. तर आषाढी वारीच्या काळात तब्बल दहा लाख 88 हजार भाविकांनी विठ्ठलाचे दर्शन घेतले आहे. मंदिर समितीकडून याबाबत नुकतीच माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. यंदाच्या आषाढी यात्रेनिमित्ताने विक्रमी १६ ते १७ लाख भाविक विठ्ठल दर्शनासाठी पंढरपुरात आले होते. यात्रा काळात सुमारे ११ लाख भाविकांनी विठ्ठल रुक्मिणीचे पदस्पर्श आणि मुख दर्शन घेतले आहे. दर्शनाला येणार वारकरी, भाविक विठोबाच्या चरणी देणगी स्वरूपात काही दान करत असतो.
त्यानुसार यंदाच्या आषाढी यात्रा काळात सर्वाधिक ७७ लाख 6 हजार ६९४ रुपयांची देणगी भाविकांनी देवाच्या चरणावर अर्पण केली. तर १७ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने तर तब्बल २ कोटी ३६ लाख रुपयांची चांदीच्या वस्तू दान स्वरुपात मंदिर समितीला मिळाल्या आहेत. पंढरपुरात येणाऱ्या भाविकांची संख्या वाढल्याने यंदा उत्पन्नात देखील मोठी वाढ आहे. यंदा सर्व मिळून साधारण ८ कोटी ३४ लाखाचे दान विठुरायाच्या चरणी आले असून गतवर्षीपेक्षा यंदाच्या आषाढीत सुमारे २ कोटींनी उत्पन्नात वाढ झाली आहे. याशिवाय देवाच्या लाडू प्रसाद विक्रीतून यंदा मंदिर समितीला सुमारे ९८ लाख ५३ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे; अशी माहिती मंदिर समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.