
तेल अवीव :- इस्रायली सैन्य दलाकडून गाझापट्टीवर जमिनीवरून हल्ले सुरूच आहेत. गेल्या २४ तासांत इस्रायलने ४०० तळांवर केलेल्या हल्ल्यात ७०० जणांचा मृत्यू झाला आहे.
‘हमास’-इस्रायल युद्ध सुरू आहे. दोन्ही बाजूंनी हल्ले-प्रतिहल्ले सुरू आहेत. इजिप्तसह अन्य देशांच्या विनंतीनंतर ‘हमास’ने आणखी दोन महिला ओलिसांची सुटका केली. दोन दिवसांपूर्वी ‘हमास’ने अमेरिकन अपहृतांची सुटका केली होती. ‘हमास’ने नुरीत कुपर आणि योचेवेद सिफशित्झ या दोन वृद्ध इस्रायली महिलांची सुटका केली. इजिप्त आणि कतारने विनंती केल्यामुळे मानवतेच्या भूमिकेतून दोन्ही ज्येष्ठ महिलांची सुटका केल्याची माहिती ‘हमास’च्या सूत्रांनी दिली.
महिलांना रेड क्रॉस या आंतरराष्ट्रीय समितीच्या अधिकार्यांकडे ताब्यात देण्यापूर्वी एका महिलेने दहशतवाद्याशी हस्तांदोलन करून त्याला आशीर्वाद दिल्याचा व्हिडीओही व्हायरल झाला आहे. ‘हमास’ने ७ सप्टेंबरला इस्रायलवर केलेल्या हल्ल्यात १,५०० जणांचा मृत्यू झाला आहे. ‘हमास’ने इस्रायली नागरिकांचे अपहरणही केले होते. ‘हमास’च्या भुयारात अद्यापही २२२ ओलीस आहेत. इस्रायलने हल्ले थांबविल्याशिवाय ओलिसांची सुटका करणार नसल्याचे ‘हमास’ने स्पष्ट केले आहे. दरम्यान, ‘हमास’ने एक पाऊल पुढे टाकल्यानंतर इस्रायलनेही युद्धाबाबत रणनीती नव्याने ठरविणार असल्याचे नमूद केले आहे.
दरम्यान, इस्रायली सैनिकांनी अत्याधुनिक तोफगोळ्यांतून गाझापट्टीतील ‘हमास’च्या तळांवर हल्ले सुरूच ठेवले आहेत. आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात ५ हजार जणांचा मृत्यू झाला आहे.