जनशक्तीचा दबाव/ मुंबई-
☯️उद्योजकांची राष्ट्रीय संघटना कॅटचा अभ्यास-
यंदाच्या दिवाळीत देशवासीय मनसोक्त खर्च करणार असून सणाच्या ४ दिवसांत उलाढालीचे सर्व विक्रम मोडून निघतील, असा अंदाज आहे. कोरोनाच्या काळातील दिवाळीच्या तुलनेत यंदा बाजारात थोडीफार नव्हे तर पाचपट अधिक उलाढाल होईल. चार दिवसांत ६५ कोटी नागरिकांच्या खरेदीतून हा आकडा ३.५ लाख कोटींच्या घरात जाण्याचा अंदाज व्यावसायिकांची राष्ट्रीय संघटना कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (कॅट) ने व्यक्त केला आहे. कमी पावसाचा उलाढालीवर परिणाम होण्याची शक्यता कॅटने फेटाळून लावली आहे, तर चिनी मालाचा बाजार उठल्याचा कॅटचा दावा आहे. रक्षाबंधनपासून सुरू झालेल्या सणांची मालिका गणेशोत्सव, नवरात्री, दुर्गापूजा, दसरा आणि करवाचौथ असा प्रवास करत दिवाळीवर थांबतात. कॅटच्या वतीने दरवर्षी देशातील प्रमुख शहरात या काळात बाजारपेठेचा अभ्यास केला जातो. यंदा २० शहरात केलेल्या अभ्यासानुसार बाजारात गेल्या वर्षीच्या तुलनेत सर्व सणांदरम्यान चैतन्य दिसून आले. यामुळे दिवाळीत खरेदीचा उच्चांक गाठला जाईल, असा अंदाज कॅटचे अध्यक्ष बी.सी.भारतीया आणि सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल यांनी सांगितले.
☯️देशवासी करणार मनसाेक्त खर्च-
देशातील वर्षातील सर्वाधिक खरेदी दिवाळीत होते. महत्त्वाच्या खरेदीसाठी दिवाळीचा मुहूर्त शोधला जातो. यामुळे उत्पादकही ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी दणदणीत ऑफर्स आणतात. २०२० आणि २०२१ मध्ये कोरोनाचे संकट असल्याने सण बंधनात साजरा झाला. यामुळे खरेदीवर मर्यादा आल्या. २०२२ मध्ये बंधनमुक्त दिवाळी १.७५ लाख कोटीची झाली. यंदा हा आकडा ३.५ लाख कोटींवर पोहोचेल. चार वर्षांत यात तब्बल ५ पट वाढ होण्याचा अंदाज आहे.
☯️चीनच्या मालाला ‘आत्मनिर्भर भारत’ची टक्कर-
दिवाळीत सजावटीच्या सामानापासून फटाक्यापर्यंत सर्वच चिनी मालाचा दबदबा असायचा. मात्र, गेल्या ८-१० वर्षांपासून सुरू असलेले प्रबोधन आणि केंद्राच्या “आत्मनिर्भर भारत’ आणि “व्होकल फॉर लोकल’सारख्या योजनांमुळे चिनी मालाचा बाजार उठला आहे. भारतात या उत्पादनांना अनुदान स्वरूपात प्रोत्साहन दिले जात असल्याने चिनी दरातच भारतीय माल मिळत आहे. यामुळे यंदा कॅटच्या एकाही सदस्याने चिनी मालाची आयात केली नाही. मात्र, छुप्या मार्गाने माल आला असल्यास ग्राहकांनीही त्यास नाही म्हणण्याचे आवाहन भारतीया आणि खंडेलवाल यांनी केले आहे.
☯️भेटवस्तूंसह विविध खरेदी-
देशातील ६५ कोटी नागरिक ४ दिवसांत सरासरी ५५०० ते १ लाख रुपये खर्च करतील. प्रामुख्याने किराणा, कपडे, मिठाई, सुकामेवा, इलेक्ट्रॉनिक्स, मोबाइल, सजावटीचे साहित्य , भेटवस्तू , किचनवेअर, दागदागिने, सौंदर्य प्रसाधने, पेंट, पर्फ्यूम आणि देवाच्या मूर्ती यावर खर्च होईल. या काळात सांस्कृतिक कार्यक्रमाच्या अायोजनातून इव्हेंट मॅनेजमेंट, हॉटेल, केटरिंग आणि ट्रान्सपोर्ट सर्व्हिस इंडस्ट्रीला चालना मिळेल.
☯️‘दि शेअर चॅट- मोज’चा ‘इंडियाज फेस्टिव्ह फिलिंग रिपोर्ट-२०२३’…
▪️47% नागरिक सरासरी दहा हजार रुपयांपर्यंत खरेदी
▪️54% लोक नवे कपडे खरेदी करण्यावर खर्च
▪️37% लोक होम अप्लायन्सेसवर
▪️30% मोबाइल फोन
▪️20% टू-व्हीलरवर
▪️17% दागिने खरेदीवर
☯️वर्ष उलाढाल-
▪️२०२० ६०-७० हजार कोटी
▪️२०२१ १.२५ लाख कोटी
▪️२०२२ १.७५ लाख कोटी
▪️२०२३ ३.५ लाख कोटी (अंदाज)