
चेन्नई- भारतीय वायुसैन्याच्या 92 व्या वर्षपूर्तीनिमित्ताने चेन्नईच्या मरीना बिचवर एका एअर शोचं आयोजन करण्यात आलं होतं. एअर शो पूर्ण झाल्यानंतर बाहेर पडण्यासाठी येथे एकच गोंधळ उडाला. गर्दी मोठी असल्याने व्यवस्थापन करणं कठीण झालं होतं. यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीत पाच जणांचा मृत्यू झाला आहे.
त्याशिवाय 200 हून जणं बेशुद्ध झाले होते. त्यामुळे अनेकांना रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली. हा एअर शो पाहण्यासाठी तमिळनाडूतील इतर शहरांमधून मोठ्या संख्येने लोक रेल्वेने प्रवास करून आले होते. एअर शो पाहण्यासाठी आलेल्या तिघांचा भीषण उन्हाळा आणि डिहायड्रेशनमुळे मृत्यू झाला. विरोधी पक्षनेता आणि AIADMK चे प्रमुख पलानीस्वामी यांनी या घटनेवरुन डीएमके सरकारवर टीका केली आहे. या कार्यक्रमासाठी पुरेशी व्यवस्था करण्यात आली नव्हती असाही आरोप त्यांनी केला आहे. डिफेंस रिलीजनुसार, या कार्यक्रमात 15 लाखांहून अधिक लोक उपस्थित होते.
वृत्तसंस्था पीटीआयने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, हा कार्यक्रम पाहण्यासाठी लोकांना कमीत कमी दोन ते तीन तास कडक उन्हात उभं राहावं लागलं होतं. एअर शोचं आयोजन सकाळी 11 ते दुपारी 1 यादरम्यान करण्यात आलं होतं. मोठी गर्दी आणि उकाड्यामुळे कार्यक्रमादरम्यान अनेकजणं बेशुद्ध पडले होते. एअर शो संपल्यानंतर मरीन बीच आणि त्याच्या आजूबाजूच्या रस्त्यांवर मोठी वाहतूक कोंडी जाली. बस, एमआरटीएस आणि मेट्रोसह स्थानिक ट्रेन खचाखच भरली. प्लॅटफॉर्मवर उभं राहणंही लोकांना कठीण झालं. एअर शो जवळील अण्णा स्क्वेअरवरील बस स्टॉपवर लोकांची मोठी गर्दी झाली होती.