पुणे – बनावट कागदपत्रांद्वारे दोघांनी ४९६ कोटी रुपयांचा वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) चुकविल्याचे उघडकीस आले आहे. जीएसटी गुप्तचर महासंचालनालयाच्या (डीजीजीआय) पुणे विभागाने ही कारवाई केली. या प्रकरणी कोरेगाव पार्क पोलिसांकडून राजस्थानमधील दोन तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत जीएसटी कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी अनुराग श्रीवास्तव यांनी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेले दोघे जण राजस्थानातील आहेत. आरोपीने बनावट कागदपत्रांचा वापर करून चार कंपन्यांची स्थापना केली. बनावट व्यवहार, कागदपत्रांद्वारे दोघांनी ‘इनपुट टॅक्स क्रेडिट’चा लाभ घेतला. बनावट व्यवहारांद्वारे दोघांनी ४९६ कोटी २७ लाख रुपयांचा कर चुकवेगिरी करून फसवणूक केली, असे तक्रारीत म्हटले आहे.
बनावट कंपन्या, व्यवहार दाखवून आरोपींनी त्याचा लाभ काही व्यावसायिकांना मिळवून दिल्याचा संशय आहे. त्या दृष्टीने तपास करण्यात येत आहे. कोरेगाव पार्क पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक रुणाल मुल्ला तपास करत आहेत.