दापोली येथील जंगलातील वन्यजीवी प्राण्यांची शिकार करण्यासाठी आलेल्या ४ जणांना अटक पहा सविस्तर…

Spread the love

दापोली :- दापोली येथील जंगलातील वन्यजीवी प्राण्यांची शिकार करण्यासाठी आलेल्या ४ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून १२ बोर रायफल व १५ जिवंत काडतुसांसह क्वालिस वाहन असा एकूण ३ लाख ३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय बळिराम नागळकर (रा. घोडबंदर रोड, भाईंदर ठाणे), योगेश विठ्ठल तुरे (रा. टाळसुरे, दापोली), सचिन कचेर पाटील, (रा. दापोडे भिवंडी, ठाणे ), करण उर्फ बंटी शिवाजी ठाकूर (रा. भिवंडी ठाकराचा पाडा, ठाणे ) अशी अटक करण्यात आलेल्या ४ जणांची नावे आहेत.
१८ जून रोजी मध्यरात्री १२ वाजल्यापासून ते १३ च्या पहाटे ५ वाजेपर्यंत संपूर्ण जिल्ह्यामध्ये पोलिस अधिक्षक रत्नागिरी धनंजय कुलकर्णी, व अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ऑपरेशन ऑल आउट’ राबविण्यात आले. ज्यामध्ये प्रामुख्याने रेकॉर्डवरील गुन्हेगार, हॉटेल्स, लॉज, संशयित वाहने इत्यादी रत्नागिरी पोलिसांमार्फत तपासणी करण्यात आली.दरम्यान पोलिसांनी खेड उपविभागामध्ये नाकाबंदी, तपासणी व गस्त घातली. दापोली पोलिस ठाणे हद्दीमध्ये वन्यजीवी प्राण्यांची शिकार करणारी टोळी वाहनासहीत फिरत असल्याची गोपनीय माहिती खेडचे उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्र मुणगेकर यांना मिळाली. यानंतर माहिती मिळताच राजेंद्र मुणगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली व नेतृत्वाखाली एक पोलिस पथक तयार करण्यात आले ज्यामध्ये दोन पंचांचा देखील समावेश करण्यात आला होता.
या पथकाद्वारे दापोली येथील जंगलमय भागात गस्त घालण्यात आली. रात्री ३ वाजता मौजे दळखण, दापोली या ठिकाणी एक संशयास्पद क्वालिस वाहन वेगाने पुढे जाताना आढळून आले . ज्याच्या टपावर दोन इसम बसलेले दिसले व त्यामधील एक इसम आपल्या हातात १२ बोर रायफल घेऊन बसला होता. पथकाद्वारे या संशयित वाहनास जागीच थांबविण्यात आले वाहनाची झडती घेण्यात आली. झडती दरम्याने गाडीमध्ये इतर २ इसम व बारा बोरची १५ जिवंत काडतुसे मिळून आली.
गुन्ह्यातील मिळून आलेल्या व त्यांच्याकडून १ बारा बोर (Midland Gun CQ Birmingham, England) बनावटीची रायफल, १५ जिवंत काडतुसे असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच दापोली पोलिस ठाणे येथे या चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page