मुंबई:- राज्यात रेशनकार्डमधील आतापर्यंत तब्बल ३४ लाख नावे कमी झाली आहेत. राज्यात आधार सीडिंग मोहीम सुरू आहे. त्यातून ही माहिती समोर आली आहे. कमी झालेल्या नावांमुळे आता राज्यातील प्राधान्य कुटुंब योजनेच्या धान्याच्या प्रतीक्षेत असलेल्या नव्या ३४ लाख लोकांना मोफत धान्याचा लाभ देता येणे शक्य आहे.
राज्यात दि. १ सप्टेंबर २०२२ पासून आधार सीडिंगची मोहीम सुरू करण्यात आली. रेशनकार्डवर जितकी नावे आहेत, त्या सर्वांचे आधारकार्ड रेशनकार्डशी या मोहिमेत जोडण्यात येत आहे. राज्यात पुणे विभागात आधारसिडिंगचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित विभागातही हे काम ९५ टक्क्यांपासून ते ९९ टक्क्यापर्यंत होत आले आहे.
राज्यात दि.२ फेब्रुवारीपर्यंतच्या आकडेवारीनुसार गेल्या पाच महिन्यांत ३४ लाख ८ हजार जणांची नावे कमी झाली आहेत. नावे कमी झालेल्यांचे धान्य बंद झाले आहे. तरीही त्याबाबत तक्रारी झालेल्या नाहीत . यामुळे कमी झालेली बहुतांशी सर्व नावे मृत्यू, विवाह आणि स्थलांतरित या कारणांनी कमी झाल्याचे स्पष्ट आहे. ज्या नावांबाबत तक्रारी आल्या, त्याची खातरजमा करून ती समाविष्ट करण्यात येत आहेत. मात्र, त्याचे प्रमाण राज्यात अत्यल्प आहे.