अर्थसंकल्पात मालमत्ता कराच्या थकबाकीचा ‘फुगा’!..
पनवेल- पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांनी 3 हजार 991 कोटी 99 लाख रुपयाचा अर्थसंकल्प अर्थसंकल्प शुक्रवारी सादर केला. विशेष म्हणजे मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत बजेटमध्ये दुपटीने वाढ करण्यात आली. कारण मालमत्ता कराच्या थकबाकी पोटी 1163 कोटी रुपये मनपाला मिळतील असा अंदाज देशमुख यांनी लावला आहे.
यामुळे 2024 – 25 या अर्थसंकल्पामध्ये थकबाकीचा फुगा दिसून येत आहे. एकूण 32 कोटी रुपयांचे शिल्लक बजेट मांडण्यात आले आहे. पनवेल महानगरपालिकेची स्थापना होऊन सात वर्ष पूर्ण झाले. दरम्यान गेल्या वर्षी सिडको ने सेवा हस्तांतरित केल्या आहेत. त्या अगोदर प्राधिकरणाकडून सोयी सुविधा दिल्या जात होत्या. सिडको ला सुद्धा रहिवाशांनी सेवाशुल्क अदा केले.
तर पनवेल महानगरपालिकेने तब्बल पाच वर्षाचा मालमत्ता कर पनवेलकरांवर लादला. त्याला सामाजिक संस्था आणि सिडको वसाहतीतील रहिवाशांनी विरोध केला आहे. या विरोधात परिवर्तन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष महादेव वाघमारे यांचा न्यायालयीन लढा सुरू आहे. सिडकोने सेवा पुरवलेल्या असताना वेगवेगळ्या सेवाविषयक कर मनपाला का भरायचा असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे.
दुहेरी मालमत्ता कराबाबत सिडको वसाहतींमध्ये तीव्र असंतोष आहे. पूर्वलक्षी कर वसूल करण्याचा तगादा पनवेल मनपाने लावला आहे. इतकेच नाही तर जप्तीच्या धमक्या दिल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर प्रशासक तथा महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी शुक्रवारी पनवेल महानगरपालिकेचा 3991 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला. गेल्या वर्षी हाच अर्थसंकल्प 2291 कोटी रुपयांचा होता.
त्यामध्ये यंदा जवळपास दुपटीने वाढ झाली आहे. याचे कारण म्हणजे मालमत्ता करापोटी असलेली थकबाकी की 1163 कोटी रुपये वसूल होईल असे प्रशासक तथा आयुक्त गणेश देशमुख यांनी गृहीत धरले आहे. त्यामुळेच त्यांनी इतक्या मोठ्या किमतीचे अंदाजपत्रक पनवेलकरांसाठी सादर केले.
आरंभीची शिल्लक 1258 कोटी रुपये दाखवण्यात आली आहे. त्याचबरोबर महानगरपालिकेला एकूण करातून 1411 कोटी रुपये येणे अपेक्षित आहे. त्यामध्ये 1163 कोटी रुपयांची थकबाकी शिल्लक असल्याचे अर्थसंकल्पामध्ये दिसून आले आहे. यावरून पनवेल महानगरपालिका पूर्वलक्षी आणि दुहेरी मालमत्ता कर वसूल करण्यासाठी आग्रही असल्याचे दिसून आले आहे.
पनवेल महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात मनपा आयुक्त गणेश देशमुख यांनी स्त्रियांसाठी ज्या योजना आखल्या आहेत, त्या स्वागतार्ह आहेत. आत फक्त त्याची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यात यावी हीच माफक अपेक्षा.
- निलम आंधळे, संस्थापिका, दिशा व्यासपीठ
महापालिकेचे महिला स्पेशल…
- महिलांना रोजगाराच्या अनुषंगाने प्रशिक्षण केंद्र सुरू करणार
- पिंक टॉयलेट उभारण्यात येणार आहेत.
- शिक्षणासाठी बाहेर जाणार्या
- विद्यार्थिनींसाठी 50 हजार रुपये शिष्यवृत्ती देणार
- आदिवासी महिला भगिनींसाठी 50 लाख रुपयांची तरतूद
- महिला सक्षमीकरण केंद्र उभारण्यात येणार आहे.
- स्त्रियांसाठी खास व्यायाम शाळा साकारण्यात येणार
- जिम ट्रेनर सुद्धा पालिका पुरवणार
- दीड हजार सीसीटीव्ही सर्किट कॅमेरे लावणार
- अबोली रिक्षा सुद्धा महिलांना स्वयंरोजगारासाठी देणार
- पनवेल महिला सुकन्या योजना राबवणार
*मुलीच्या नावावर बँकेमध्ये 30 हजार रुपये ठेवणार - महिलांसाठी स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू करणार
- महापालिका तेथे कोचिंग क्लासेस सुरू करणार
- नवीन आर्थिक वर्षात सव्वा दोनेशे कोटी रुपयांची तरतूद