
ठाणे- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना शिंदे गटाचा मेळावा आझाद मैदानावर पार पडला. हा दसरा मेळावा संपल्यानंतर परतीच्या प्रवासात शिंदे गटाच्या दोन बसचा ठाण्यातील शहापूरजवळ दोन ठिकाणी अपघात झाला. या अपघातात २५ जण जखमी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. सर्व जखमींवर शहापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मुंबई-नाशिक महामार्गावर शहापूरजवळ शिंदे गटाची बस मेळावा उरकून मुंबई ते सिल्लोड परतीचा प्रवास करत होता. मात्र रात्रीच्या सुमारास शहापूरजवळ बसला मागून ट्रकने जोरदार धडक दिली. त्यानंतर बस डिव्हायडरवर आदळल्याने अपघात झाला. त्यानंतर ट्रकला मागून शिंदे गटाच्याच दुसऱ्या बसने जोरदार धडक दिली आणि ही बस डाव्या बाजूला जात उलटली. या अपघात २५ जण जखमी झाले असून त्यांच्यावर शहापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.