*काबूल-* पाकिस्तानने अफगाणिस्तानवर मोठा हवाई हल्ला केला आहे. पाकिस्तानने पक्तिका प्रांतातील बरमल जिल्ह्यात हा हवाई हल्ला केल्याचे सांगितले जात आहे. या हवाई हल्ल्यात महिला आणि लहान मुलांसह 15 जण ठार झाल्याची प्राथमिक माहिती आहे. पाकिस्तानचा हा हल्ला 24 डिसेंबरच्या रात्री झाला, ज्यामध्ये सात गावांना लक्ष्य करण्यात आले.
अफगाणिस्तानच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हवाई हल्ल्यातील मृतांचा आकडा वाढू शकतो. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अफगाणिस्तानवरील या हवाई हल्ल्यात अनेक गावांनाही लक्ष्य करण्यात आले आहे. मात्र, पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी अद्याप या हवाई हल्ल्याला अधिकृत दुजोरा दिलेला नाही. पाकिस्तानी लढाऊ विमानांनी अफगाणिस्तानच्या काही भागात हवाई हल्ले केले. या हवाई हल्ल्यांमुळे मोठा विध्वंस झाला आहे. पाकिस्तानच्या हवाई हल्ल्यानंतर या भागात तणाव वाढला आहे.
तालिबानच्या संरक्षण मंत्रालयाने या हल्ल्याचा निषेध केला आहे. पाकिस्तानच्या या हल्ल्यानंतर तालिबानच्या संरक्षण मंत्रालयाने चोख प्रत्युत्तर देण्याची धमकी दिली आहे. अफगाणिस्तानला आपली जमीन आणि सार्वभौमत्वाचे रक्षण करण्याचा पूर्ण अधिकार असल्याचे तालिबानने एक निवेदन जारी केले आहे. पाकिस्तानी लढाऊ विमानांनी बॉम्बफेक केलेल्या भागात वझिरीस्तानच्या निर्वासितांचाही समावेश होता, असंही तालिबान संरक्षण मंत्रालयाने म्हटलं आहे. पाकिस्तानच्या या हवाई हल्ल्यात आतापर्यंत 15 जण ठार झाल्याची माहिती आहे. मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये महिला आणि लहान मुलांचा समावेश आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अजूनही अनेक भागात मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. अनेक जखमींची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अशा परिस्थितीत मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.