नवीदिल्ली- दिल्लीतील अलीपूर येथील एका पेंट फॅक्टरीला काल गुरुवारी सायंकाळच्या सुमारास अचानक आग लागली. क्षणार्धात आगीचा भडका उडाला आणि बघता-बघता संपूर्ण फॅक्टरी आगीच्या भक्षस्थानी आली. या दुर्घटनेत ११ कामगारांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर अनेकजण जखमी झाले आहे.
आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे तब्बल २२ बंब घटनास्थळी दाखल झाले. अथक प्रयत्नानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आली. मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही. आगीत जखमी झालेल्या कामगारांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीतील अलीपूर येथे एका पेंट फॅक्टरी आहे. गुरुवारी या फॅक्टरीत कामगार काम करीत होते. तेव्हा अचानक भीषण आग लागली. ही आग अत्यंत भयंकर होती, की मोठमोठे धुराचे लोळ उठले. यामुळे कामगारांना बाहेर पडण्याची संधी मिळाली नाही.
आगीच्या विळख्यात सापडल्याने ११ कामगारांचा होरपळून मृत्यू झाला. दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात, कारखान्याला लागलेली भीषण आग आणि आकाशात उंच-उंच जात असलेले धुराचे लोट दिसत आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणण्यासाठी अथक प्रयत्न केले. रात्री नऊच्या सुमारास आग आटोक्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. यानंतर मदत आणि बचाव कार्य सुरू होते. फॅक्टरीत झालेल्या स्फोटामुळे ही आग लागली असावी, अशी प्राथामिक माहिती पोलिसांनी दिली आहे.