
विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी सोमवारी (दि. १७) अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता.
मुंबई : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या पाच जागांसाठी विधानभवनात उमेदवारांनी अर्ज दाखल केले. विधान परिषदेच्या पाच रिक्त जागांसाठी ११ अर्ज दाखल झालेत. राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेचे प्रत्येकी एक उमेदवार व भाजपाचे तीन उमेदवार, अशा एकूण पाच उमेदवारांनी प्रत्येकी दोन अर्ज दाखल केलेत. त्यामुळं या पाच उमेदवारांचे दहा अर्ज दाखल झालेत. त्याशिवाय एका अपक्ष उमेदवारानं एक अर्ज दाखल केलाय. अशा प्रकारे एकूण ११ अर्ज प्राप्त झाले आहेत. विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी सोमवारी (दि. १७) अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता.
*सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांची उपस्थिती…*
सोमवारी दुपारी शिवसेनेचे चंद्रकांत रघुवंशी, राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय खोडके, भाजपाचे संदीप जोशी, दादाराव केचे व संजय केणेकर यांनी अर्ज दाखल केले. महाराष्ट्र विधान भवन सचिवालयाचे सचिव व निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र भोळे यांच्याकडे उमेदवारांनी अर्ज दाखल केले. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार संजय खोडके यांचा अर्ज दाखल करताना उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, माजी मंत्री छगन भुजबळ, माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, माजी मंत्री अनिल पाटील व पक्षाचे आमदार उपस्थित होते. तसेच, शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत रघुवंशी व भाजपाचे संदीप जोशी, दादाराव केचे व संजय केणेकर यांचे अर्ज भरताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री गिरीश महाजन उपस्थित होते. आर्वीचे माजी आमदार दादाराव केचे यांनी विधानपरिषदेचा उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी आर्वीचे विद्यमान आमदार सुमीत वानखेडे यांची विशेष उपस्थिती होती.
*अर्ज मागे घेण्याची मुदत कधीपर्यंत?…*
मंगळवारी, १८ मार्च रोजी दुपारी बारा वाजता या अर्जाची छाननी केली जाईल. त्यानंतर २० मार्च रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे, अशी माहिती महाराष्ट्र विधान भवन सचिवालयाचे सचिव व निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र भोळे यांनी ‘ईटीव्ही भारत’शी बोलताना दिली. दरम्यान, या पाच जागांसाठी स्वतंत्र निवडणूक होणार असून आमदार गोपीचंद पडळकर यांच्या रिक्त झालेल्या जागेवर दादाराव केचे यांनी दोन अर्ज दाखल केलेत. तर, त्याच जागेसाठी अपक्ष उमेदवारानं देखील अर्ज दाखल केलाय. त्यामुळं गोपीचंद पडळकर यांच्या रिक्त जागेवर तीन अर्ज दाखल करण्यात आलेत.
*चार जागा बिनविरोध?…*
भाजपाचे दादाराव केचे यांनी गोपीचंद पडळकर यांच्या रिक्त झालेल्या जागेवर दोन अर्ज भरले आहेत. त्यांच्या समोर एका अपक्ष उमेदवारानं अर्ज दाखल केलाय. मात्र, त्यांच्या व्यतिरिक्त इतर चारही उमेदवारांसमोर इतर कोणीही अर्ज दाखल केलेले नाहीत. त्यामुळं अर्ज भरलेले चार उमेदवार बिनविरोध निवडून येतील अशी शक्यता आहे. दादाराव केचे यांच्यासमोर ज्या अपक्ष उमेदवारानं अर्ज दाखल केलाय. त्याची छाननी उद्या होईल त्यानंतर त्या जागेवर चित्र देखील स्पष्ट होईल.
*भाजपामध्येच हे घडू शकतं…*
सर्व सामान्य कार्यकत्याला पक्षानं मोठी संधी दिलीय. केवळ भाजपामध्येच हे घडू शकतं. पक्षानं जी महत्त्वपूर्ण जबाबदारी दिलीय. त्याचं गांभीर्यानं पालन करुन पक्षाचा व जनतेचा विश्वास सार्थ ठरवण्याचा विश्वास, भाजपाचे उमेदवार संदीप जोशी यांनी व्यक्त केलाय.
*अर्ज दाखल करण्याची आज शेवटची तारीख…*
पाच जागांवरील आमदार विधानसभेवर निवडून गेल्यानं या पाच जागा रिक्त झाल्या आहेत. आमश्या पाडवी, प्रवीण दटके, गोपीचंद पडळकर, रमेश कराड आणि राजेश विटेकर हे विधान परिषदेचे सदस्य विधानसभेवर निवडून गेल्यानं या जागा रिक्त झाल्या होत्या. आज (१७ मार्च) अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. त्यानंतर १८ मार्च रोजी उमेदवारी अर्जांची छाननी होणार आहे. त्यानंतर उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी अंतिम तारीख २० मार्च आहे. त्यानंतर २७ मार्चला सकाळी नऊ ते संध्याकाळी चार वाजेपर्यंत मतदान होईल. त्यानंतर संध्याकाळी पाच वाजता मतमोजणीला प्रारंभ होईल. त्यानंतर निकाल जाहीर होईल, असा विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला आहे.