✴️शिमगा हृदयातला हळवा कोपरा !!!….

Spread the love

रत्नागिरी – कोकणातील माणूस कामधंद्यासाठी कितीही लांब गेलेला असला तरी होळी आणि गणपतीच्या सणांना त्याचे पाय आपोआप गावाकडे वळतात. घरट्याबाहेर उडालेल्या पिल्लाची जशी पक्षिण वाट पाहते, तसेच गाव आणि गावकरी आपल्या चाकरमान्यांची वाट पहाट असतात. कोकणात विशेषत: रत्नागिरी जिल्ह्यात शिमगा सण सुमारे ५ ते १५ दिवस असतो. प्रथेप्रमाणे फाल्गुन पौर्णिमेला होळीचा मुख्य दिवस असतो. यामध्ये मुख्य काम म्हणजे ग्रामदेवतेची पालखी सजवून त्यात रुपे (देवीच्या उत्सवमूर्ती) ठेवून पालखी देवळातून सहाणेवर आणणे. सहाण ही जागा मुख्यत्वेकरून गावातील चावडी असते. तर गावदेवीचे देऊळ हे दूर जंगलात असते. तर पालखी सजवून ढोल-ताशाच्या गजरात साहणेवर आणायची ती होळीच्या दिवशी संध्याकाळी. त्यानंतर पालखी नाचवण्याचा कार्यक्रम सुरू होतो.

त्यानंतर रात्री आंब्याच्या किंवा ताडाच्या झाडाची होळी तोडून आणणे. हे काम खूप जिकिरीचे आणि जबाबदारीचे असते. सुमारे ५०-७० फूट उंचीचे आणि सुमारे १२००-१५०० किलो वजनाचे झाड तोडून ते गावकरी खांद्यावरून नाचवत साहणेवर पालखीसामोर आणून उभे करतात. हे सगळे होईपर्यंत सकाळचे ४ वाजतात. मग होम केला जातो, ज्यामध्ये मागच्या वर्षीच्या होळीचा जो खुंट शिल्लक असतो तो एक मोठा खड्डा खणून त्यात उभा करतात व त्याभोवती गवत रचून मग पालखी प्रदक्षणा होते आणि मग होम जाळला जातो. गावातील नवीन जोडपी या होमात नारळ देतात. तो एक महत्त्वाचा विधी असतो.

होम झाल्यावर रात्रभर दमलेले सगळे गावकरी, चाकरमानी घरी जातात, मग थोडेसे झोपून/आंघोळ-देवपूजा उरकून परत सहाणेवर जमतात आणि होळीच्या शेंड्याखाली सगळे गाव उभा राहून गार्‍हाणे नावाचा कार्यक्रम होतो, ज्यात मागच्या वर्षीचे नवस फेडणे आणि यावर्षी नवीन नवस करणे असा प्रकार असतो. त्यानंतर बैठक (गावची सभा) असते, ज्यात महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होते. त्यानंतर तिसऱ्या दिवशी पालखीने खुणा काढणे हा कार्यक्रम असतो, यामध्ये गावचा गुरव आदल्या रात्री एक नारळ सहाणे समोर पटांगणात जमिनीत लपवून ठेवतो. तो नारळ पालखी शोधून काढते. हा कार्यक्रम देखील पाहण्यासारखा असतो.

त्यानंतर सत्यनारायण पूजा आणि भजन व रात्री गावचे खेळे-नमन हा लोकनृत्यप्रकार असतो. काही ठिकाणी पालखीनृत्य स्पर्धा ही असतात. त्यानंतर पुढील दिवसात पालखी घरोघरी दर्शन देते. याचा समारोप काही ठिकाणी शिंपणे या कार्यक्रमाने तर काही ठिकाणी देवीचा दिवट्या गोंधळ घालून होते. तर असा आहे कोकणचा शिमगोत्सव! मंडळी, गावकरी आणि चाकरमानी यांच्या साथीने कोकणची संस्कृती अनुभवायला एकदा तरी शिमग्याला कोकणात जा !!!……

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page