▪️गेले अनेक महिने ‘रत्नागिरी द. जिल्ह्याचा जिल्हाध्यक्ष कोण होणार?’ अशी भाजपा कार्यकर्त्यांमध्ये रंगलेली चर्चा अखेर आज संपली असून महाराष्ट्र भाजपाचे अध्यक्ष श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांनी अध्यक्षांची अधिकृत घोषणा केली आहे. यामध्ये रत्नागिरी द. जिल्ह्याच्या अध्यक्षपदाची माळ जिल्हा संघटन सरचिटणीस पदावर कार्यरत असलेल्या श्री. राजेश विनायक सावंत यांच्या गळ्यात पडली आहे. यानंतर प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, “माझे नवनियुक्त सहकारी पक्षासाठी आपली संपूर्ण शक्ती पणाला लावतील. यांच्या साथीने आम्ही २०२४ च्या महाविजयासाठी सज्ज होत आहोत. भाजपा नव्या भारताच्या उभारणीसाठी कटिबद्ध आहे. पक्षाच्या बांधणीत कार्यकर्त्यांचे योगदान सर्वोच्च आहे. पक्षासाठी कार्यकर्ते सर्वस्व असून त्यांच्या अविश्रांत कष्टामुळे पक्षाने आज नवी उंची गाठली आहे. माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा.”
▪️जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती होण्यापूर्वी श्री. राजेश सावंत हे रत्नागिरी द. जिल्ह्याच्या संघटन सरचिटणीस पदी कार्यरत होते. २०१७ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखाली वैद्यकीय शिक्षण, माहिती आणि तंत्रज्ञान, खाद्य आणि नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण आणि बंदरे खात्यांचे राज्यमंत्री असलेल्या ना. रविंद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांचा भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश झाला. यानंतर त्यांच्यावर संघटन सरचिटणीस पदाचे दायित्त्व सोपवण्यात आले. तत्पूर्वी शिवसेनेमध्ये रत्नागिरी उपजिल्हाप्रमुख पदावर ते कार्यरत होते. भाजपामध्ये प्रवेश करताना ते रत्नागिरी नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष म्हणून कार्यरत होते.
▪️मात्र पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांचा ‘सबका साथ, सबका विकास’ हा मंत्र आणि तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सर्वसमावेशक नेतृत्त्व यांमुळे प्रभावित होऊन शिवसेनेतील लाभाच्या पदांचा त्याग करून त्यांनी भाजपाची कास धरली. मागील सहा वर्षे संघटन सरचिटणीस म्हणून जिल्ह्यात लक्षवेधी कामगिरी केल्याने जिल्हाध्यक्ष पदासाठी त्यांचे नाव चर्चेत होते. कुशल नेतृत्त्व आणि दांडगा प्रशासकीय अनुभव असतानाही अनेकवेळा त्यांना पडद्यामागे रहावे लागले. मात्र या कालखंडात कोणतीही नाराजी किंवा मतप्रदर्शन न करता ते आपल्या पद्धतीने पक्ष संघटना वृद्धिंगत करत राहिले. त्यांच्या या निष्ठेचे, गुणांचे आणि कौशल्याचे आज खऱ्या अर्थाने चीज झाले असे म्हणत जिल्ह्यातील कार्यकर्ते त्यांना शुभेच्छा देत आहेत.