▶️सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना मार्च २०२३ च्या २७१ कोटीच्या खर्चास मान्यता…

Spread the love

▶️जिल्ह्यात ४ ठिकाणी डायलेसिस केंद्र उभारणार

▶️‘पेपरलेस’ नियोजन बैठकीसाठी सदस्यांना टॅब देणार : पालकमंत्री उदय सामंत

⏩️रत्नागिरी (प्रतिनिधी) : अल्पबचत सभागृहात झालेल्या आजच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना २०२२-२३ मार्च अखेर झालेल्या २७१ कोटी खर्चास मान्यता देण्यात आली. नियोजन समितीची बैठक ‘पेपरलेस’ करण्याच्या उद्देशाने सर्व सदस्यांना टॅब देण्याचा तसेच जिल्ह्यातील लांजा, दापोली, खेड, कामथे या चार ठिकाणी डायलेसिस केंद्र उभारण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली.

या बैठकीला खासदार सुनिल तटकरे, आमदार भास्कर जाधव, आमदार प्रसाद लाड, आमदार राजन साळवी, आमदार शेखर निकम, आमदार योगेश कदम, जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी उपस्थित होते. जिल्हा नियोजन अधिकारी सत्यविनायक मुळे यांनी सुरुवातीला स्वागत करुन दुखवटा ठराव मांडला आणि विषय वाचन केले.

अनुसूचित जाती उपयोजना सन २०२२-२३ मार्च अखेर झालेल्या १७ कोटी ८१ लाख खर्चास तसेच आदिवासी उपयोजना सन २०२२-२३ मार्च अखेर झालेल्या १ कोटी १२ लाख ४१ हजार खर्चास मान्यता देण्यात आली. सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना सन २०२३-२४ अंतर्गत ३०० कोटी इतका अर्थसंकल्पीय नियतव्यय मंजूर झाला असून, ९० कोटी निधी प्राप्त झाला आहे. अनुसूचित जाती उपयोजना २०२३-२४ साठी १९ कोटी इतका अर्थसंकल्पीय नियतव्यय मंजूर आहे. आदिवासी उपयोजना क्षेत्राबाहेरील उपयोजना सन २०२३-२४ अंतर्गत १ कोटी १२ लाख ४६ हजार अर्थसंकल्पीय नियतव्यय मंजूर आहे.

पालकमंत्री श्री. सामंत यावेळी म्हणाले जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीबाबत तातडीने पंचनामे करुन मदत द्या. अधिकाऱ्यांनी विशेषत: जिल्हा परिषदेने लोकप्रतिनिधींशी चर्चा करुन कामांच्या याद्या घेऊन त्याबाबत निधीचे वाटप करावे. आपत्कालीनसाठी ७०३ कोटींचा निधी मंजूर झाला असून, त्यामधून धूपप्रतिबंधक बंधारे, अंडरग्राऊंड केबलींग, निवारा गृह यामधूनच करण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून गोळप येथे सौर ऊर्जा प्रकल्पाच्या माध्यमातून वीज निर्मिती करुन ग्राम पंचायतींच्या स्ट्रीट लाईटची बिले ५० टक्के कमी करण्यात येणार आहेत. तसाच दुसरा प्रकल्प गुहागर येथेही करण्याचे प्रस्तावित आहे.

अग्रीकल्चर फिडर १ मेगा व्हॅटचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी महावितरणला गुहागरमध्ये १० एकर जागा एका दिवसात दिल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिली. पालकमंत्री श्री. सामंत म्हणाले, प्रत्येक मतदार संघातील नदी, उपनद्यातील गाळ काढण्यासाठी १ कोटीचा निधी दिला जाईल. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी ‘नाम’ या संस्थेशी सामंजस्य करार करावा. साकव दुरुस्तीसाठी नवीन हेड निर्मितीसाठी वित्तमंत्र्यांकडे पाठपुरावा करु. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त प्रत्येक तालुक्यात ७५ फूट उंचीचा ध्वजस्तंभ उभारण्यात येणार आहे.

आमदार प्रसाद लाड यांच्या माध्यमातून सीएसआर मधून जिल्ह्यासाठी डायलेसिस मशीन मिळवून जिल्ह्यात ४ ठिकाणी डायलेसिस केंद्रे उभारली जातील. त्यासाठी स्टाफ, नर्स प्रशिक्षित करा. जलजीवन मिशन मधील कामे, मुख्यमंत्री ग्राम सडक, प्रधानमंत्री ग्राम सडक योजनांमधील कामे दर्जेदार झाली पाहिजेत, अशी सूचना करतानाच जिल्ह्याच्या विकासासाठी जास्तीत जास्त निधी आणण्यासाठी सांघिक प्रयत्न करु या, असे आवाहनही त्यांनी केले.

विशेष निमंत्रित सदस्यांना पहिल्याच बैठकीत संधी

आजच्या या बैठकीत विशेष निमंत्रित सदस्य प्रकाश साळवी, अश्फाक हाजू, प्रमोद पवार, प्रभाकर गोलांबडे, शशिकांत चाळके, स्मिता जावकर, निलेश सुर्वे, सचीन करमरकर, सुनिल कुरुप, बाळकृष्ण साळवी, मोहन मुळे, मुझफ्फर मुकादम आणि संदेश शेट्ये यांचे स्वागत करण्यात आले. पालकमंत्री श्री. सामंत यांनी त्यांच्या आजच्या पहिल्याच बैठकीत प्रत्येक सदस्यांना बोलण्यास आवर्जुन संधी दिली. शिवाय विकास कामांबाबत लेखी मागणी करण्यासही सांगितले. सर्वच उपस्थित लोकप्रतिनिधींनी चर्चेत सहभाग घेतला. शेवटी जिल्हा नियोजन अधिकारी श्री. मुळे यांनी सर्वांचे आभार मानले.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page