ZP, पंचायत समितीच्या निवडणुकांची घोषणा:5 फेब्रुवारीला मतदान, 7 फेब्रुवारीला निकाल; 16 तारखेपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया…

Spread the love

मुंबई- राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि त्यांतर्गतच्या 125 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 5 फेब्रुवारी रोजी मतदान, तर 7 फेब्रुवारी रोजी मतमोजणी होईल. जिल्हा परिषदांच्या एकूण 731, तर पंचायत समित्यांच्या 1 हजार 462 जागांसाठी ही निवडणूक होत आहे. या सर्व जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या क्षेत्रांत आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे. राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आज येथे आयोजित एका पत्रकार परिषदेत ही घोषणा केली.

वाघमारे यांनी सांगितले की, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर या 12 जिल्हा परिषदा आणि त्यांतर्गतच्या 125 पंचायत समित्यांसाठी ही निवडणूक होत आहे. या निवडणुकीची सूचना 16 जानेवारी 2026 रोजी प्रसिद्ध होईल. सूचना प्रसिद्ध करण्याची प्रक्रिया संबंधित जिल्हाधिकारी आपापल्या स्तरावर पार पाडतील. निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया 16 जानेवारीपासून सुरू होईल. उमेदवारांना 21 जानेवारीपर्यंत आपली उमेदवारी दाखल करता येईल.

खालील तक्त्यात पाहा निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम…

जिल्हाधिकाऱ्यांकडून निवडणूक कार्यक्रमाची प्रसिद्धी -16 जानेवारी
उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत -16 ते 21 जानेवारी
उमेदवार अर्जांची छाननी 22 जानेवारी अर्ज मागे घेण्याची मुदत- 27 जानेवारी (दुपारी 3 वाजेपर्यंत)
अंतिम उमेदवार यादी व निवडणूक चिन्ह वाटप- 27 जानेवारी (दुपारी 3.30 वाजेनंतर),मतदानाचा दिवस 5 फेब्रुवारी (सकाळी 7.30 ते सायं. 5.30 पर्यंत),मतमोजणी 7 फेब्रुवारी (सकाळी 10 वाजेपासून)

संबंधित क्षेत्रात आचारसंहिता निवडणूक कार्यक्रम जाहीर…

झाल्यापासून संबंधित जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या क्षेत्रात आचारसंहिता लागू झाली आहे. संबंधित क्षेत्रात ही आचारसंहिता लागू झाली असली तरी अन्य ठिकाणीदेखील संबंधित जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या मतदारांवर प्रभाव पाडणारी घोषणा किंवा कृती करता येणार नाही; परंतु नैसर्गिक आपत्तीबाबत करावयाच्या उपाययोजना किंवा मदतीसंदर्भात आचारसंहितेची आडकाठी असणार नाही. राज्य निवडणूक आयोगाने 4 नोव्हेंबर 2025 रोजी निर्गमित केलेल्या आदेशानुसार आचारसंहितेचे पालन करणे आवश्यक असेल.

‘मताधिकार’ मोबाईल ॲप

जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठीच्या मतदार यादीतील मतदाराचे नाव, मतदान केंद्र आणि उमेदवारांविषयी माहिती जाणून घेण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने ‘मताधिकार’ हे मोबाईल ॲप उपलब्ध करून दिले आहे. ते सध्या फक्त ‘गुगल प्ले स्टोअर’वरून डाऊनलोड करता येईल. त्यात मतदाराचे ‘संपूर्ण नाव’ किंवा ‘मतदार ओळखपत्रा’चा (EPIC) क्रमांक नमूद करून मतदार यादीतील नाव शोधता येईल. मतदार यादीतील नाव शोधण्यासाठी https://mahasecvoterlist.in/ हे संकेतस्थळदेखील उपलब्ध करून दिले आहे.

ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगासाठी
मतदान केंद्रांवर ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, तान्ह्याबाळासह असणाऱ्या स्त्रिया, गरोदर स्त्रिया आदींना मतदानासाठी प्राधान्य दिले जाईल. दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठी मतदान केंद्रावर कायमस्वरुपी रॅम्पची व्यवस्था नसल्यास तात्पूर्ती सुविधा उभारली जाईल. व्हिलचेअरचीही व्यवस्था असेल. मतदान केंद्रावर विजेची व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची, सावलीची सुविधा, शौचालयाची व्यवस्था उपलब्ध करून दिली जाईल. सर्व मतदान केंद्रांमध्ये किमान सुविधा असणे आवश्यकच असेल; परंतु याशिवाय शक्य असेल तिथे आदर्श मतदान केंद्र उभारण्याचा प्रयत्न असेल. महिला मतदारांची संख्या जास्त असलेल्या ठिकाणी सर्व निवडणूक अधिकारी- कर्मचारी व पोलिस कर्मचारी महिला असतील, असे मतदान केंद्र ‘पिंक मतदान केंद्र’ म्हणून ओळखले जाईल.

मनुष्यबळाची व्यवस्था..

जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी सुमारे 125 निवडणूक निर्णय अधिकारी आणि 125 सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येईल. साधारणत: सुमारे 1 लाख 28 हजार इतक्या निवडणूक अधिकारी कर्मचाऱ्यांची गरज भासेल, तीदेखील व्यवस्था झाली आहे. आवश्यक तेवढ्या मनुष्यबळाच्या उपलब्धतेबाबत महसूल विभागीय आयुक्त आणि सर्व जिल्हाधिकाऱ्यांना वेळोवेळी निर्देश देण्यात आले आहेत; तसेच त्यासंदर्भात वेळोवेळी संबंधितांच्या बैठकाही घेण्यात आल्या आहेत.

प्रचार समाप्तीनंतर जाहिरातींना बंदी…

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या प्रचार समाप्तीसंदर्भात संबंधित विविध अधिनियमांमध्ये वेगवेगळ्या तरतुदी आहेत. जाहीर प्रचाराचा कालावधी संपल्यानंतर मुद्रित, इलेक्ट्रॉनिक आणि समाजमाध्यमांसह कुठल्याही माध्यमाद्वारे प्रचारविषयक जाहिराती प्रसिद्ध किंवा प्रसारित करता येत नाहीत. महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समिती अधिनियम, 1961 चे कलम ‘28ब(1)’ अन्वये जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठीच्या मतदान सुरू होण्याच्या दिनांकापूर्वी 24 तास अगोदर प्राचाराची समाप्ती होईल. त्यानुसार जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी 5 फेब्रुवारी 2026 रोजी मतदान होत असल्यामुळे मतदानाच्या दिनांकापूर्वी 24 तास अगोदर म्हणजे 3 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी रात्री 12 वाजता जाहीर प्रचाराची समाप्ती होईल आणि त्यानंतर जाहिरातींची प्रसिद्धी आणि प्रसारणही बंद होईल; परंतु अन्य अधिनियम/ नियमांतीn तरतुदींनुसार 3 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री 10 वाजेनंतर सभा/ प्रचारफेऱ्या/ ध्वनिक्षेप आदींचा अवलंब करता येणार नाही.

माध्यम प्रमाणन व संनियंत्रण समिती…

जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक जाहीर झाल्यानंतर लगेच संबंधित जिल्हाधिकारी आपल्या स्तरावर राज्य निवडणूक आयोगाच्या 9 ऑक्टोबर 2025 रोजीच्या ‘निवडणुकांच्या प्रयोजनार्थ प्रसारमाध्यम संनियंत्रण व जाहिरात प्रमाणन आदेश, 2025’ नुसार ‘जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणन व संनियंत्रण समिती’ स्थापन करतील. जिल्हाधिकारी स्वत: या समितीचे अध्यक्ष; तर जिल्हा माहिती अधिकारी सदस्य सचिव असेल. ही समिती प्रचारविषयक इलेक्ट्रॉनिक माध्यमांसाठीच्या प्रस्तावित जाहिरातींचे पूर्वप्रमाणन, पेड न्यूजसंदर्भातील तक्रारी/ प्रकरणांची चौकशी, त्यांचे निराकरण; तसेच विविध प्रसारमाध्यमांतील वृत्तांकनाच्या संकेतांच्या पालनाबाबत संनियंत्रण आणि देखरेख करेल. राज्य निवडणूक आयोगाच्या स्तरावर आयोगाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली ‘राज्यस्तरीय माध्यम प्रमाणन व संनियंत्रण समिती’ कार्यरत असेल.

उमेदवारांसाठी खर्च मर्यादा…

जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी उमेदवारांना खर्च मर्यादा पुढील प्रमाणे असेल: 71 ते 75 निवडणूक विभाग असलेल्या जिल्हा परिषदांसाठी 9 लाख आणि त्यांतर्गतच्या पंचायत समित्यांसाठी 6 लाख रुपये खर्च मर्यादा असेल. 61 ते 70 निवडणूक विभाग असेल्या जिल्हा परिषदांसाठी 7 लाख 50 हजार आणि त्यांतर्गतच्या पंचायत समित्यांसाठी 5 लाख 25 हजार रुपये खर्च मर्यादा असेल. 50 ते 60 निवडणूक विभाग असेल्या जिल्हा परिषदांसाठी 6 लाख आणि त्यांतर्गतच्या पंचायत समित्यांसाठी 4 लाख 50 हजार रुपये खर्च मर्यादा असेल.

जिल्हा परिषदेच्या जागांचा तपशील-

एकूण जिल्हा परिषदा- 12
एकूण जागा- 731
महिलांसाठी जागा- 369
अनुसूचित जातींसाठी जागा- 83
अनुसूचित जमातींसाठी जागा- 25
नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी
जागा- 191

पंचायत समित्यांच्या जागांचा तपशील
एकूण पंचायत समित्या- 125
एकूण जागा- 1,462
महिलांसाठी जागा- 731
अनुसूचित जातींसाठी जागा- 166
अनुसूचित जमातींसाठी जागा- 38
नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी जागा- 342

दुबार मतदारांची ओळख पटवण्यात यश…

आयोगाने दुबार मतदारांची टूलद्वारे ओळख पटवली आहे. या प्रकरणी निवडणूक निर्णय अधिकारी व जिल्हाधिकारी मार्गदर्शक सूचनांनुसार योग्य ती कारवाई करतील. याशिवाय मतदारांना आपले नाव, प्रभाग क्रमांक व त्याची मतदान केंद्र शोधण्यासाठी मताधिकार मोबाईल अॅप विकसित करण्यात आले आहे. ते गुगल अॅपवरून डाऊनलोड करता येईल, असे निवडणूक आयुक्त म्हणाले.

1 जुलै 2025 ची मतदार यादी अंतिम…

या निवडणुकीसाठी 1 जुलै 2025 ची मतदार यादी वापरली जाईल. ही यादी केंद्रीय निवडणूक आयोगाने पुरवली आहे. 3 नोव्हेंबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाली आहे. 27 नोव्हेंबर रोजी मतदान केंद्रनिहाय मतदार यादी प्रसिद्ध झाली आहे. या मतदारयाद्या केंद्रीय निवडणूक आयोगाकडून प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे त्यात कोणतेही नाव समाविष्ट करणे किंवा वगळण्याचे काम राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यकक्षेत येत नाही.

एकूण मतदान केंद्र 25,482 निवडणूक आयुक्तांनी सांगितले की, या निवडणुकीत 25, 482 एवढी मतदान केंद्र आहेत. ही निवडणूक ईव्हीएमद्वारे होईल. यात 51, 537 कंट्रोल यूनिट, तर 1 लाख 10 हजार 329 एवढे बॅलेट यूनिट्स वापरले जातील. सर्व मतदान केंद्रांवर मतदारांसाठी पिण्याचे पाणी, सावलीची सुविधा, शौचालय आदींची व्यवस्था केली जाईल. काही मतदान केंद्र हे आदर्श मतदान केंद्र म्हणून निर्माण केले जातील. काही मतदान केंद्र हे पिंक स्वरुपाचे असतात. पिंक मतदान केंद्रावर महिला मतदारांची संख्या जास्त असेल. त्यात सर्व निवडणूक अधिकारी, कर्मचारी व सुरक्षा कर्मचारी ह्या महिला असतील.

5 फेब्रवारीला मतदान, 7 फेब्रुवारीला निकाल…

जिल्हाधिकाऱ्यांकडून निवडणूक कार्यक्रमाची प्रसिद्धी 16 जानेवारी रोजी केली जाईल. त्यानंतर 16 ते 21 जानेवारीपर्यंत उमेदवारांना आपले उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. 22 जानेवारी रोजी उमेदवारी अर्जांची छाननी केली जाईल. उमेदवारांना 27 जानेवारी दुपारी 3 वाजेपर्यंत आपले उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. अंतिम उमेदवार यादी व निवडणूक चिन्हांचे वाटप 27 जानेवारी रोजी दुपारी 3.30 नंतर केले जाईल. त्यानंतर 5 फेब्रुवारी रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत मतदान होईल. त्यानंतर 7 फेब्रवारी रोजी सकाळी 10 वाजेपासून मतमोजणी होऊन निकाल घोषित होतील.

मतदारांना 2 मते द्यावे लागणार…

या निवडणुकीत प्रत्येक मतदाराला 2 मते द्यावे लागतील. यातील एक मत जिल्हा परिषद व दुसरे पंचायत समितीसाठी असेल. या निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया ऑफलाईन पद्धतीने राबवण्यात येईल. विविध राजकीय पक्ष व उमेदवारांच्या मागणीनुसार ही प्रक्रिया महापालिका निवडणुकीसारखीच राबवण्यात येत आहे. या निवडणुकीत ज्या जागा राखीव आहेत. त्या जागांवर जातवैधता पडताळणी आवश्यक आहे. जातप्रमाणपत्र व जातवैधता पडताळणी उमेदवारी अर्जासोबत सादर करणे महत्त्वाचे आहे. पण एखाद्या उमेदवाराकडे जात वैधता प्रमाणपत्र नसेल, तर त्याने जात पडताळणी समितीकडे केलेल्या अर्जाची सत्यप्रत किंवा अन्य पुरावा सादर करावा लागेल.

पण निवडून आल्यानंतर त्याला 6 महिन्यांच्या आत आपले प्रमाणपत्र सादर करावे लागेल. अन्यथा त्याची निवड रद्द होईल, असे वाघमारे म्हणाले.

कोणत्या 12 जिल्हा परिषदांसाठी होणार निवडणूक?…

दिनेश वाघमारे यांनी सांगितले की, 12 जिल्हा परिषद व 125 पंचायत समितीसाठी राज्यात निवडणूक होईल. यात कोकण विभागातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे विभागातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर विभागातील छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव व लातूर या 12 जिल्हा परिषदांचा समावेश आहे.

*निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेला सुरुवात…*

राज्य निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेला सुरुवात झाली आहे. राज्याचे निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे पत्रकारांना संबोधित करत आहेत. त्यांनी राज्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक होणार असल्याची घोषणा केली आहे.

कैलास गोरेंनी सुप्रीम कोर्टात दाखल केली होती याचिका…

सोलापूर जिल्ह्यातील कुर्दुवाडी येथील जिल्हा परिषद, पंचायत समिती मेंबर्स असोसिएशनचे पदाधिकारी कैलास गोरे यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. नगरपालिका, महापालिकांप्रमाणेच ५० टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडलेल्या जिल्हा परिषदांच्याही निवडणुका न्यायालयीन निर्णयास अधीन राहून घ्याव्यात, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली होती.

15 फेब्रुवारीपर्यंत निवडणूक घेणे बंधनकारक….

सर्वोच्च न्यायालयाने गतवर्षी राज्य निवडणूक आयोगाला 31 जानेवारीपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रखडलेल्या निवडणुका घेण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, राज्यात पहिल्या टप्प्यात नगरपंचायत व नगरपरिषदांची निवडणूक झाली. त्यानंतर सध्या मुंबईसह राज्यभरातील 29 महापालिकांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. निवडणूक आयोगाने या प्रकरणी सुप्रीम कोर्टात धाव घेऊन जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका घेण्यासाठी वाढीव मुदत मागितली होती. पण कोर्टाने त्यांना अवघ्या 15 दिवसांची मुदत देत हा निवडणूक कार्यक्रम 15 फेब्रुवारीपर्यंत संपवण्याचे आदेश दिले.

त्यानुसार, राज्य निवडणूक आयोगाने आज दुपारी 4 वाजता पत्रकार परिषदेचे आयोजन केले आहे. आयोगाच्या पत्रकानुसार, राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे या पत्रकार परिषदेत जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांसंदर्भात सह्याद्री अतिथिगृहात पत्रकारांशी संवाद साधणार आहेत. त्यात या निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे.

कोणत्या 12 जिल्हा परिषदांची होणार निवडणूक?…

लातूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव, सोलापूर, कोल्हापूर, पुणे, सातारा, सांगली, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या 12 जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गत येणाऱ्या 125 पंचायत समित्यांच्या निवडणुकीची आज घोषणा होणार आहे. या सर्वच जिल्हा परिषदांचे आरक्षण 50 टक्क्यांच्या आत आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टाच्या आदेशांनुसार या निवडणुका घेण्यात येणार आहेत. उर्वरित 20 जिल्हा परिषदा व पंचायत समितीच्या निवडणुका दुसऱ्या टप्प्यात होणार आहेत.

ओबीसी आरक्षणावर 21 जानेवारीला सुनावणी…

सुप्रीम कोर्टात येत्या 21 जानेवारी रोजी ओबीसी आरक्षण व बांठिया आयोगाच्या वैधतेच्या मुद्यावर ऐतिहासिक सुनावणी होणार आहे. या सुनावणीत आरक्षणाची 50 टक्क्यांची मर्यादा व सभापती पदांचे आरक्षण यावर अंतिम निर्णय येण्याची शक्यता आहे. तोपर्यंत होणाऱ्या सर्व निवडणुका व नियुक्त्या न्यायालयाच्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहतील.

🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️⬜️🟥🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️

🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..
➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)
➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page