
चिपळूण :- चालकाचा ताबा सुटल्याने एका एसटी बसने रस्त्याकडेला आपल्या दुचाकीसह उभ्या असलेल्या तरुणाला धडक देत अक्षरश: फरपटत नेले. त्यात या तरुणाचा जागीच मृत्यू झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना गुरुवारी सकाळी ८:३० वाजण्याच्या सुमारास चिपळूण लगतच्या खेर्डी येथे घडली. अनिकेत विजय दाभोळकर (३४) असे या तरुणाचे नाव आहे. ही घटना घडली तेव्हा त्यांचे वडीलही त्याच्यासोबत होते. त्यांच्या डोळ्यादेखत त्यांच्या मुलाचा अपघाती मृत्यू झाला.
मंडणगड – धाराशिव ही एसटी बस सकाळी ८ वाजता चिपळूण आगारातून मार्गस्थ झाली. चिपळूण – कराड मार्गावर खेर्डी दत्तमंदिरासमोर चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. रस्ता सोडून बस साइडपट्टीकडे वेगाने गेली. त्याचवेळी अनिकेत दाभोळकर हा भाजी आणि फळे घेण्यासाठी तेथे आपल्या दुचाकीसह उभा होता. बसने त्याला दुचाकीसह फरफटत नेले आणि अक्षरशः चिरडले.
अनिकेतला त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु तोपर्यंत त्याची प्राणज्योत मालवली होती. घटनास्थळी मोठा गोंधळ उडाला. एसटी बसचालकाला लाखोल्या वाहून काहीजण त्यांच्या अंगावरही गेले. अनिकेतला चिरडल्यानंतर बस तेथीलच एका फळ विक्रेत्याच्या शेडमध्ये घुसली होती. त्यामुळे त्याचेही नुकसान झाले. चिपळूण पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली.
या अपघाताची नोंद चिपळूण पोलिस स्थानकात करण्यात आली असून, मंडणगड डेपोचे एसटी चालक गोपाळ वाघमारे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी चिपळूण पोलिस अधिक तपास करत आहेत.
जाहिरात


