▪️ भारताचा ज्ञात इतिहास खूप मोठा आणि दैदिप्यमान आहे. राष्ट्र उभारणीचा एककलमी कार्यक्रम राबवणारी अनेक ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व या भारतवर्षाने पाहिली आहेत. कोणी यांना राष्ट्रपुरुष म्हणतो तर कोणी राष्ट्र उद्धारक इतकाच काय तो फरक. बाकी सर्व भारतीयांच्या मनात असे धुरीण सामाजिक आदर्श म्हणून ‘धृवपद’ मिळवून आहेत. दरवर्षी भारत सरकारच्या माध्यमातून अशा सामाजिक आदर्शांचा शोध घेतला जातो. व पद्म पुरस्कार प्रदान करून त्यांच्या कार्याचा गौरव केला जातो. आजपर्यंत अनेक महान व्यक्तिमत्त्वांचा गौरव आम्ही पाहिला आहे; अनुभवला आहे. त्यांच्या कार्याचा आवाका जाणूनही घेतला आहे. मात्र २६ जानेवारी, २०२३ रोजी आमच्या आदरणीय दादा इदातेंना पुरस्कार पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला आणि पुन्हा एकदा दादांचा प्रवास डोळ्यांसमोर तरळून गेला.
▪️ भिकू रामजी इदाते असे मूळ नाव असणारे आमचे दादा आम्ही पाहिलेले, अनुभवलेले ‘कर्मवीर’ आहेत. टेटवली, दापोली येथे २ जून १९४९रोजी त्यांचा जन्म झाला. आत्यंतिक गरीब परिस्थिती अनुभवलेल्या दादांचा ‘कर्मवीर’ होईपर्यंतचा प्रवास अत्यंत प्रेरणादायक आहे. ‘कर्मवीर’ या पुस्तकातल्या शब्दाची व्याख्या किती व्यापक असते हे समजून घेण्यासाठी दादांचा सामाजिक कार्याचा आवाका जाणून घ्यावा लागेल. रत्नागिरी जिल्ह्यातील नाणीज पिठाचे पिठाधीश जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज यांनी दादांच्या कामाचा सन्मान योग्य अर्थाने व्हावा यासाठी त्यांना ‘कर्मवीर’ संबोधून गौरविले आहे. ईश्वरी अधिष्ठान कार्यास लाभलेल्या दादांच्या सामाजिक कार्याचे कौतुक प्रत्यक्ष संत करत असतील तर त्यांचे कर्तृत्त्व त्या उपाधीच्या पलीकडे आहे हे सिद्ध होते.
▪️ दादा सरोदे समाजातील पहिले पदवीधर. संघकाम करता यावे म्हणून बी.एस्सी. पूर्ण झाल्यावर बी.एड. करुन दादा दापोलीत शिक्षक म्हणून नोकरी करु लागले. शिक्षण सुरू असतानाच दादांचे लग्न झाले. स्वत:च्या संसाराबरोबरच चार बहिणींच्या लग्नाची जबाबदारीही दादांच्या खांद्यावर होती. प्रचारक जाता आले नाही याची टोचणी लागून राहील्याने दादा शाळेतून मिळणारी प्रत्येक सुट्टी संघप्रवासासाठी घेत असत. देशात आणिबाणी लागू झाल्यानंतर अनेक नातेवाईकांनी संघकाम सोडून देण्याचा आग्रह केला. तो न जुमानता संघकाम करण्याची परिणिती मिसाखाली अटक होण्यात झाली. पगार थांबला. घर संसार उघड्यावर आला. त्यावेळी आईने (सौ. वंदना) प्रसंगी रस्त्यावर दगड फोडण्याचे काम करुन संसार टिकवला. संघात शाखेचा गटनायक, जिल्हा कार्यवाह, १५ वर्षे महाराष्ट्र प्रांताचे कार्यवाह, क्षेत्रीय (महाराष्ट्र व गुजरात) बौद्धिक प्रमुख, सामाजिक समरसता विषयाचे अखिल भारतीय संयोजन अशा विविध जबाबदार्यांवर दादांनी काम केले. चार बहिणींची लग्न झाल्यावर दादांनी संघकामासाठी नोकरीचा राजीनामा दिला. घरची परिस्थिती बेताची असल्याने राजीनाम्यावरुन अनेकांनी नाराजी व्यक्त केली. मात्र संघकामाला वेळ मिळावा म्हणून दादा राजीनाम्याच्या निर्णयावर ठाम राहीले. व्यवसाय सुरू केला तर संघ कामाला अधिक वेळ देता येईल हा त्यामागे विचार होता. तत्कालिन स्थानिक संघ कार्यकर्त्यांनी दापोलीतील राजकमल मेडिकल स्टोअर्समध्ये दादांना भागीदार करुन घेण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी १५ वर्षांनी दादांनी डी.फार्मसीचे शिक्षण घेतले.
▪️ ‘राष्ट्र प्रथम’ या भावनेने समाजाचे काम करताना दादांनी कधीही व्यक्तिगत लाभ, सुख आणि फायदा यांची तमा न बाळगता अहोरात्र समाजभान जपले. कोणी काहीही म्हणो, जग इकडचे तिकडे होवो, दादा आपले नियोजित कार्य जबाबदारीने पूर्ण करणारच याची प्रचीती आजपर्यंत अनेकांनी घेतली आहे.
▪️ एकदा एका कार्यक्रमाला जात असताना दादांच्या गाडीला अपघात झाला. दादा जखमी झाले. परिस्थिती चिंताजनक होती. दादांना इस्पितळात अतिदक्षता विभागामध्ये ठेवण्यात आले. कार्यक्रम ठरलेला होता आणि तो अत्यंत महत्त्वाचा होता. त्यामुळे तो त्यांच्या कार्यकर्त्यांनी पार पाडला. कार्यक्रम पार पाडून कार्यकर्ते दादांना पाहण्यासाठी इस्पितळात आले. अतिदक्षता विभागामध्ये कुणालाही सोडत नव्हते. दादांची नजर अतिदक्षता विभागाच्या दरवाजाच्या काचेवर खिळलेली. कार्यकर्ते बाहेरून काचेतून दादांना पाहत होते. दादा शुद्धी-बेशुद्धीच्या सीमारेषेवर होते. पण, नजर मात्र कार्यकर्त्यांकडे आणि त्यांनी ओठांची हालचाल केली. कार्यकर्त्यांना वाटले दादांना वेदना होत असाव्यात. पण नाही, दादा त्या गंभीर अस्वस्थेत, अक्षरश: मृत्यूच्या दारातून माघारी फिरून येतानाही कार्यकर्त्यांची वाट पाहत होते. त्यांनी विचारले, “कार्यक्रम नीट झाला ना? काही अडचण तर नाही ना आली?” कार्यकर्त्यांसाठी हा अनपेक्षित, सुखद आणि तितकाच शिकवण देणारा प्रसंग होता. समाजाप्रती असणाऱ्या आपल्या जबाबदारीविषयी किती निष्ठा असावी याचे प्रत्यक्ष उदाहरण डोळ्यांसमोर होते त्यांच्या. अशी निष्ठा आणि असे समाजभान असणारी प्रत्येक व्यक्ती ‘कर्मवीर’ होऊ शकते अशी शिकवण देणारा तो विलक्षण प्रसंग होता. ज्यांनी तो क्षण अनुभवला त्यांचे भाग्य थोर एवढेच म्हणेन.
▪️ भटक्या-विमुक्त आयोगाचे काम करताना दादांना संपूर्ण देशाचा प्रवास करावा लागे. एका डोंगराळ भागात प्रवास करत असताना तेथील वातावरण अत्यंत खराब होते. वातावरणातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाले होते. अशा विपरीत हवामानात स्थानिकही घराबाहेर पडत नसत. दादा आयोगाचा अहवाल पूर्ण करायला आले असल्याने येथील काम आटोपल्याशिवाय दुसरीकडे जाणे शक्यच नव्हते. त्या हवामानामुळे दादांची तब्येतही खराब झाली. सहकारी, स्थानिक रहिवासी आणि डॉक्टरांनी दादांना सक्तीने विश्रांती घेण्यासाठी भाग पाडले. दुसऱ्या दिवशीही तसेच वातावरण. डॉक्टरांचा पुन्हा तोच सल्ला. यावेळी मात्र दादांनी नम्रपणे विश्रांतीला नकार दिला. कारण, तब्येतीपेक्षा त्यांनी हाती घेतलेले काम पूर्ण करायचे होते. समाजाचे काम वेळेत पार पाडले तरच समाजाचे देणे फेडल्याचे मानसिक समाधान मिळते अशी त्यांची धारणा होती.
▪️ दादा भटक्या-विमुक्त समुदायासाठी कार्य करतात. ते त्या समाजाचे प्रतिनिधित्व करतात, असा कित्येकांचा गैरसमज असू शकतो. पण, दादांचे याविषयी स्वतःचे असे एक परखड मत आहे. ते म्हणतात, “समाज म्हणजे जातिपाती नाही, सगळा भारतच एक समाज आहे. त्यामुळे एक ‘हिंदू’ आणि ‘भारतीय’ म्हणून माझे कर्तव्य आहे की, वंचित बांधवांच्या प्रगतीसाठी शक्य तेवढे अधिक काम करायला हवे. समरस समाजाची बांधणी करताना कुणी मागे राहून चालणार नाही. त्यामुळेच दादा कळत्या वयापासून सर्व समाजाच्या प्रगतीचा विचार करत होते. फार पुढच्या काळात रा. स्व. संघाच्या एका बैठकीत त्यांनी भटक्या-विमुक्त समाजाला केंद्रित करून काम करण्यास सुरुवात केली. त्या बैठकीमध्ये असताना एका स्वयंसेवकाने सांगितले की, सोलापूरमध्ये लुटमार केली म्हणून जे दोघे पारधी पोलीस कारवाईमध्ये मारले गेले, ते तर दरोडा पडत असताना त्यांच्या पालामध्ये होते. पण, केवळ गुन्हेगार सापडत नाहीत आणि या समाजातल्या लोकांना अजूनही ‘गुन्हेगार’ म्हणून पाहिले जाते, म्हणून त्यांना राहत्या जागेतून उचलून गोळ्या घातल्या गेल्या. तुम्ही चौकशी करा. काहीतरी करा.” त्यानंतर खऱ्या अर्थाने ‘दादा’ या समाजाचे ‘पालक’ झाले. त्यांनी या समाजासाठी स्वत:ला वाहून घेतले.
▪️ आणीबाणीच्या काळात येरवडा तुरुंगामध्ये असताना रामभाऊ म्हाळगींनी “तू का नाही भटक्या-विमुक्त समाजाचा अभ्यास करत?” असा थेट प्रश्न त्यांना विचारला होता; नुसता विचारलाच नाही, तर त्यासंबंधीचे सगळे साहित्य, संदर्भ दादांना दिले होते. त्या साहित्याने, त्या संदर्भांनी दादांच्या कार्याला संजीवनी प्राप्त करून दिली. पुढच्या कालावधीत रमेश पतंगे, नाना नवले, रमेश महाजन वगैरेंसोबत दादांची समरसतेची बैठक पक्की होत गेली. दुसरीकडे रा. स्व. संघाचे महाराष्ट्र स्तरावरचे काम करताना प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे आदी मंडळींशीही संपर्क वाढत गेला. मात्र, या संपर्काचे दादांनी कधीही राजकारण केले नाही. उलट राजकीय सत्ताधाऱ्यांनीही समरस समाज निर्माण करण्यासाठी काय करायला हवे, यासाठी दादा म्हणजे एक पथदर्शकच झाले. त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे सध्या खा. अमर साबळे आणि आ. भाई गिरकर यांनी दत्तक घेतलेली गावे. खा. साबळे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे जन्मगाव आंबवडे दत्तक घेतले, तर आ. गिरकरांनी माता रमाबाईंचे वणंद गाव दत्तक घेतले. दादांनी समाजाच्या प्रगतीसोबतच त्या समाजाचे माणूसपण मिळवून द्यायचा, नैतिक हक्क मिळवून द्यायचा नेहमीच प्रयत्न केला आहे. त्यामुळेच की काय, १९९९ साली महाराष्ट्र शासनाने नेमलेल्या विमुक्त जाती व भटक्या जमाती अभ्यास व संशोधन समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांना स्वीकारण्याची विनंती करण्यात आली. पुढे राज्य मागासवर्गीय आयोगाचे दोन वेळ सदस्य व सहा महिने ते हंगामी अध्यक्ष राहिले. २०१५ साली भारत सरकार नियुक्त राष्ट्रीय विमुक्त जाती व भटक्या जमाती आयोगाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी जबाबदारी पार पाडली. पुन्हा २०१९ साली दादा भारत सरकार नियुक्त केंद्रीय विमुक्त भटक्या व अर्धभटक्या जमाती कल्याण आणि विकास मंडळाचे अध्यक्ष म्हणून नियुक्त झाले.
▪️ “सरकारचा आणि त्यातील लोकांचा दादांवर इतका विश्वास का?” हा प्रश्न स्वाभाविकपणे काही लोकांच्या मनात येत असेल. पं त्याचे उत्तर अत्यंत सोपे आहे. दादांनी कधीही घड्याळ्याच्या काट्यावर पाट्या टाकण्याचे काम केले नाही. दिलेली जबाबदारी यशस्वीरित्या पार पडण्याची आपली जबाबदारी आहे आणि तीही १०० टक्के सत्य निकषांवर, एवढेच त्यांना ठाऊक असते. दिलेले काम उरकून टाकायचे आणि मोकळे व्हायचे, असे दादांनी आजपर्यंत कधीही केले नाही. उदाहरणार्थ, भटक्या-विमुक्त समाजाचे काम करायचे म्हणजे काय तर सरकारला कामे निर्धारित करून त्यांची यादी सुपूर्द करणे होय. पण असे काम त्यांनी कधीही केले नाही, तर या यादीतील कामांसोबत अन्य कोणती कामे करता येणे शक्य आहे, या यादीतील समाजांच्या जवळपासचे अन्य समाज कोणते आहेत? याची माहिती घेऊन त्यांना मान्यता मिळवून द्यायचे किचकट आणि सर्वार्थाने जिकिरीचे कामही दादांनी केले. ‘मरी आईवाले’ समाजातील लोकांचा कोणत्याही जातीत समावेश नव्हता. परंतु, दादांच्या सतत प्रयत्नांमुळे या समाजाचा प्रथमच भटके-विमुक्तांमध्ये समावेश झाला. देवीच्या नावाने अंगावर कोरडे ओढणाऱ्या आणि वंचितांपेक्षाही भयंकर असे वंचित भटके जिणे जगणाऱ्या ‘मरीआईवाल्या’ला दादांनी लोकशाही भारताचे नागरिक बनण्यासाठी मोठे सहकार्य केले.
▪️ हे सगळे करताना दादांनी कुटुंब, गाव समाज यांच्याकडेही अजिबात दुर्लक्ष केले नाही. कुटुंबाला जगण्यासाठी पुरेसे अर्थाजन करून दादा २०-२५ दिवस समाजकार्य, देशकार्य करण्यासाठी घराबाहेरच राहायचे. यावेळी त्यांच्या सुविद्य पत्नीने त्यांना मोलाची साथ दिली हे मात्र खरे. वैयक्तिक पातळीवर समाजासाठी खऱ्या अर्थाने भटके जीवन जगताना दादांना मधुमेहाने जखडले. गेली २० वर्षे दादा दररोज हाय-इन्सुलिनच्या गोळ्या घेतात. आणि तरीही ३६५ दिवस काम करतात. देशभर समाजाच्या प्रगतीचा आलेख निर्माण करताना दादा आपल्या गावाला विसरले नाहीत. रत्नागिरी-दापोली परिसरातल्या समस्यांचा पाठपुरावा करताना दादा कुठेही कमी पडले नाहीत. या परिसरातील शिक्षण आणि स्वावलंबनाचा प्रश्न सोडवताना दादा अनेक आयामातून कार्य करत आहेत. जबाबदारी स्वीकारून प्रकल्प उभारत आहेत. या परिसरातील कित्येक सेवाभावी मंडळे, स्वयंसेवी संस्था, वंचितासाठींच्या आश्रमशाळा, वसतिगृहे वगैरेंची निर्मिती दादांच्या प्रेरणेने झाली आहे.
▪️ अतिशय शांत, संयमित स्वरात दादा प्रत्येकाशी बोलतात. बरं एखाद्याला अमूक एक गोष्ट करायला सांगायची असेल तरी, दादा जबरदस्तीने कोणतेही काम करायला लावत नाहीत, हा प्रत्येकाचा अनुभव. दादांच्या घरासमोर परिचित युवक राहायला आला. युवकही समाजशील. या युवकाने संघाशी जोडले जावे, असे दादांनी काय कोणत्याही स्वयंसेवकाने प्रयत्न केलेच असते. दादा दररोज त्याला भेटायचे. क्षेम-कुशल विचारायचे. शेवटी इतकेच म्हणायचे, “गावात शाखा लागते.” कित्येक महिने हेच चालले. शेवटी त्या युवकाच्या मनात आले – दादा दररोज सांगतात, गावात शाखा लागते. जाऊन पहावे एकदा. तो युवक एकदा गेला आणि त्यानंतर नियमित शाखेत जाऊ लागला.
▪️ दादांनी देशभरातल्या भटक्या-विमुक्तांच्या प्रश्नांना गवसणी घातली. पण, त्याचवेळी स्वत:च्या सरोदे समाजाच्या प्रश्नांनाही मार्ग शोधून दिला. आज सरोदे समाजात १०० टक्के साक्षरता आहे, समाजातील बहुसंख्य लोक उच्चपदावर कार्यरत आहेत. यासाठी दादांचे योगदान मोठे आहे. समाजात पूर्वी चांगल्या-वाईट प्रसंगांमध्ये दारू पिण्याची प्रथा होती. पण, दादांच्या शब्दाला मान देऊन परिसरात दारूबंदीला अग्रक्रम देण्यात आला.
▪️ मागे वळून पाहताना आजही भागवत मास्तर आणि कृष्णामामा महाजन यांचे नाव घेताना दादांचा आवाज गहिरवतो. डोळ्यांच्या कडा पाणावतात. ते सांगतात, “घरची गरिबी, वडील पायाने अधू, पण कष्टकरी. आई दुर्वा विकायची. प्रसंगी भीक मागणेही क्रमप्राप्त. आईची मुले जगत नसत. त्यामुळे ‘मुले जगू दे’ म्हणून आईने देवीकडे भीक मागितली आणि म्हणून मी ‘भिकू’ जन्मलो. पहिली-दुसरीत शिकत असतानाही मी छोटी-मोठी कामे करायचो. दुपारी शाळेतून आलो की मासे पकडायला जायचो. एके दिवशी माशाचा गळ पायात रूतला. आईने लोखंड पायाला लागून एक मुलगा मरताना पाहिला होताना. तिचा तर जीव थाऱ्यावर राहिला नाही. गळ पायातून निघत नव्हता. वेदनेने माझा जीव अर्धा झाला. भागवत मास्तरांना हे कळल्यावर हातातले काम टाकून ते घरी आले. मला त्यांनी उचलले आणि दापोलीला नेले. डॉक्टरांच्या मदतीने गळ काढला. मास्तरांचे प्रेम, स्नेह माझ्या मनात समाजभानाची, माणुसकी जाणीव रूजवून गेले. तेथून पुढे मी भागवत मास्तरांमुळे संघशाखेत गेलो, ते आजतागायत जात आहे. कृष्णमामांनीही मला शिक्षणाविषयी नव्या जाणिवा दिल्या. संघ स्वयंसेवक असलेल्या या दोघांनीही माझ्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी मदत केली. मी आज जो आहे तो रा. स्व. संघामुळे आणि मी रा. स्व. संघामध्ये आलो, ते भागवत मास्तरांमुळे. त्यामुळे भागवत मास्तर माझ्यासाठी अखंड प्रेरणास्रोत आहेत.” अशा आठवणी सांगताना त्यांचे डोळे पाणावत.
▪️ या प्रवासादरम्यानच समाजातील समस्यांवर उत्तर शोधत दादांनी काही संस्थाही सुरू केल्या. असोंडमध्ये मागास विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह सुरू करुन संस्थात्मक कामाचा श्रीगणेशा झाला. आज पैसे कमावण्यासाठी अनेक संस्था उभ्या रहातात. दादांनी अनेकवेळा पदरमोड करुन समाजहितासाठी संस्था उभ्या केल्या. सामाजिक समरसता मंच या संघविचारांच्या संस्थेचे काम दादांवर सोपविण्यात आले. तेव्हापासून दादांची धावपळ, प्रवास अधिकच वाढला. सोलापूरला दादांना अपघात झाल्यानंतर नंदीबैल, मांग, मातंगी, धनगर, फासेपारधी, मसणजोगी, गोपाळ, मरीआईवाले, जोशी, वासुदेव,आदी अनेक ज्ञातींच्या माणसांनी रुग्णालयाबाहेर गर्दी केली. या मंडळींसाठी दादा देवमाणुस होते.
▪️ ज्या संघटनेला दुर्लक्ष, अनुल्लेख, हेटाळणी आणि विशेषतः महाराष्ट्रात गांधी हत्येनंतर मोठ्या हिंसक विरोधाला, राजकीय दमनाला तोंड द्यावं लागलं अशा राज्यात दादांची पिढी संघाची निव्वळ सैद्धांतिक, वैचारिक मांडणी पटली म्हणून अत्यंत चिवटपणे, चिकाटीने संघाच्या विस्तारात अहोरात्र खपत राहिली. संघ विचार प्रसारात सक्रिय राहिलं की त्याला द्वेषाचा सामना करावा लागतो ही स्थिती असताना आणि संघा सोबत राहून भविष्यात कोणताही राजकीय, आर्थिक फायदा होणार नाही याची पक्की खात्री असताना दादा निष्ठेने संघाला आपलं जीवित कार्य मानून पुढे जात राहिले. संघाचा राजकीय साथी जनसंघ निवडणुका लढत, अडखळत पुढे जात राहिला हे खरे पण त्यामुळे काही अनुकूल राजकीय स्थिती निर्माण होईल याची कोणतीही खात्री नव्हती तरीही दादांसारखे लाखो कार्यकर्ते पुढे मार्गक्रमण करत राहिले. त्यांनी ज्या विचारधारेला साक्षात परमेश्वराचे अमूर्त स्वरूप मानलं, ती मानणारा अजून एक मनुष्य देशाचा सलग दुसऱ्यांदा पंतप्रधान झालेला दादांनी बघितला, शिवाय त्यांच्या सोबत दादांनी सलग बराच काळ काम करण्याचा आनंद घेतला.
▪️ एका विशिष्ट समाज घटकासाठी काम करताना दादा फक्त त्याच वर्तुळात बंदिस्त झाले नाहीत आणि मागास, वंचित समाजासाठी काम करणाऱ्या अन्य नेत्यांसारखा दुसऱ्या समाज घटकांचा पराकोटीचा द्वेष करायची त्यांना गरज भासली नाही कारण, सकारात्मकता आणि प्रखर बुध्दीमत्ता यामुळे त्यांच्यात निर्माण झालेला पराकोटीचा आत्मविश्वास! आपला मुद्दा पटवून देताना त्यांना कुणी कधी चिडलेलं किंवा आक्रमक झालेलं बघितलं नाही आणि त्यामुळेच ते आज लाखो कार्यकर्त्यांसाठी दीपस्तंभासारखे उभे आहेत. संघाने जेव्हा सामाजिक समरसता विषयावर मोठा जोर द्यायला सुरुवात केली तेव्हापासून आजपर्यंत दादांनी आणि त्यांच्यासोबत पद्मश्री मिळालेल्या रमेश पतंगेनी जे परिश्रम, लेखन, प्रवास, कार्यक्रम आणि संघटनात्मक काम केलंय ते अतुलनीय आहे.
▪️ जी विचारधारा कधी राष्ट्राच्या मुख्य प्रवाहात येईल अशी अपेक्षा कुणी बाळगली नाही तीच विचारधारा आज देश चालवत आहे आणि संघ आता शंभरीच्या उंबरठ्यावर आहे अशावेळी निरपेक्ष भावनेने संघ काम करत उभं आयुष्य जगलेल्या दादांना “पद्मश्री” मिळणं हा त्यांच्या पिढीतल्या प्रत्येकाला निखळ आनंद मिळवून देणारा आहे! आयुष्याची कृतार्थता म्हणतात ती हीच असावी बहुतेक.
▪️ अशा प्रतिष्ठेच्या पदांवर काम करताना स्वच्छ चारित्र्याची प्रतिमा, पारदर्शकता प्रसिध्दीपराङमुख दादांनी जोपासली. या पदांमुळे त्यांच्या राहणीमानात, जीवनमानात कोणताही बदल झाला नाही. अनेक सत्कार, पुरस्कार, मान सन्मान त्यांना मिळाले. पण या कर्मयोग्याने त्यात स्वत:ला गुंतवून न ठेवता आपला कर्मयज्ञ सुरू ठेवला आहे. वाढते वय, बालपणी झालेली आबाळ, अविश्रांत प्रवास यामुळे मधुमेह, रक्तदाब, गुडघेदुखी, हृदयविकार यासारखे आजार त्यांना चिकटले आहेत. पण त्यांनाही मित्र बनवून आजही ते “कार्यमग्नता जीवन व्हावे, मृत्यु ही विश्रांती” या संघगीताप्रमाणे कार्यरत आहेत आणि माझ्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत आहेत. त्यामुळे मी आज निश्चितपणे म्हणेन पद्मश्री ‘कर्मवीर’ दादासाहेब इदातेंच्या रूपाने मी माणसात खरा देव पाहिला.