मुंबई- उरणमधील यशश्री शिंदेच्या हत्येप्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. मृत यशश्री शिंदेचा गहाळ मोबाईल अखेर पोलिसांच्या हाती लागला आहे. उरणमधील हत्याकांडात यशश्रीचा मोबाईल हा अत्यंत महत्त्वाचा पुरावा मानला जात होता. मात्र तिच्या मृत्यूपासून तिचा मोबाईल सापडलेला नव्हता. मात्र आता अखेर तो मोबाईल पोलिसांना सापडला आहे. यामधून अनेक खळबळजनक खुलासे होण्याची शक्यता आहे.
दाऊदला केली होती कर्नाटकातून अटक….
यशश्री शिंदेच्या हत्येनंतर आरोपी दाऊद शेखला पोलिसांनी कर्नाटकच्या गुलबर्गामधून अटक केली होती. सध्या तो पोलिस कोठडीतच आहे. त्याला अटक झाल्यानंतर त्याची प्राथमिक चौकशी केली तेव्हा त्याने यशश्रीची हत्या केल्याची कबुली दिली होती. त्याच्यावर पोलिसांकडून अॅट्रॉसिटीच्या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, त्याला 13 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
महत्त्वाचे धागेदोरे उलगडण्याची शक्यता….
पोलिस चौकशीमध्ये गेल्या पाच वर्षांपासून आमच्या दोघांमध्ये मोबाईलदद्वारे संपर्क होता, अशी कबुली अटकेनंतर दाऊद शेखने दिली होती. तेव्हापासूनच हा मोबाईल या प्रकरणातील तपासाच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जात होता. मात्र मोबाईल गहाळ असल्याने पोलिसांकडे ठोस असा पुरावा नव्हता. आता यशश्रीचा मोबाईल सापडल्यामुळे पोलिसांना या प्रकरणाचा तपास करणं आता आणखी सोपं होणार आहे.
पोलिसांनी मोबाईल लॅबकडे पाठवला….
दरम्यान, पोलिसांनी डाटा मिळवण्यासाठी हा मोबाईल लॅबकडे पाठवला आहे. आता यामधून नेमके काय खुलासे होणार ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. याप्रकरणी आधी लव्ह जिहादचा संशय व्यक्त केला जात होता. मात्र दाऊदच्या अटकेनंतर यशश्री आणि दाऊद यांच्यात मैत्री होती हे पोलिसांनी स्पष्ट केले होते.
यशश्रीसोबत नेमकं काय घडलं?….
उरणमधील यशश्री शिंदे या 22 वर्षीय तरुणीची निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आली होती. एकतर्फी प्रेमातून गेल्या अनेक वर्षांपासून तिच्या मागावर असलेल्या दाऊदने यशश्रीची निर्दयीपणे हत्या करत तिच्या मृतदेहाची अक्षरशः विटंबना केली होती. तिच्या गुप्तांगावर आणि पोटावर अनेक वार करुन यशश्रीचा मृतदेह छिन्नविछिन्न करण्यात आला होता. त्यानंतर उरणमधील सगीर ब्रदर्स पेट्रोल पंपामागील मैदानावरील झुडुपांमध्ये तिचा मृतदेह फेकून देण्यात आला. यशश्रीच्या वडिलांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात एका दाऊद शेख नामक व्यक्तीचा उल्लेख केला. तेव्हापासूनच पोलिसांनी दाऊद शेखला शोधण्यास सुरूवात केली. यशश्रीचा आरोपी दाऊद शेखच्या कर्नाटकातून पोलिसांनी मुसक्या आवळल्या.
मृतदेह जनावरांनी विकृत केल्याचा संजय…
दरम्यान, यशश्रीचा मृतदेह हा झुडुपांमध्ये आढळून आला होता. त्यामुळे जनावरांनी तिच्या मृतदेहाची विटंबना केली असावी असा संशय उरणच्या पोलिस आयुक्तांनी व्यक्त केला होता.