चिपळूण : उरणमधील यशश्री शिंदेची झालेले हत्या, या पार्श्वभूमीवर चिपळूण शहरात हिंदूनिष्ठ संघटनांनी गुरुवारी काढलेल्या मोर्चाच्या वेळी एका महिलेने केलेली शिवीगाळ, याच्या निषेधार्थ चिपळुणात आज शुक्रवारी कडकडीत बंद पाळण्यात आला. व्यापारी बंधूसह सर्वपक्षीय, सर्वधर्मीयांनी शहरातून मोर्चा काढून यशश्री शिंदे हिच्या मारेकाऱ्याला फाशीची शिक्षा द्यावी, अशा मागणीचे निवेदन पोलीस व महसूल विभागाला दिले. चिपळूण बाजारपेठेसह खेर्डी व अन्य भागातील दुकाने शंभर टक्के बंद होती. एसटी, शाळा-महाविद्यालयांच्या बसेस व मेडिकल्स केवळ सुरू होती. चिपळूणमध्ये बाजारपेठेत कडकडीत बंद पाळण्यात आला, त्यामुळे शहरातील रस्त्यांवर शुकशुकाट दिसून येत होता.