
देवरूख- देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयात ‘जागतिक योग दिनाचे’ आयोजन विविध उपक्रमाद्वारे करण्यात आले. विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलेल्या योग दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजना आणि आर्मी व नेव्ही एनसीसी विभागाने केले होते. विद्यार्थ्यांसाठी योग प्रशिक्षण, विद्यार्थ्यांचे योग प्रात्यक्षिक सादरीकरण, योगविषयक ऑनलाइन प्रश्नमंजुषा स्पर्धा, विद्यार्थ्यांच्या पोस्टरचे प्रदर्शन, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व माहितीच्या आधारे उद्बोधन करण्यात आले.
कार्यक्रमाचा शुभारंभ प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर यांनी केला. प्राचार्य डॉ. तेंडोलकर यांनी आपल्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांना योगाभ्यासाचे शारीरिक व मानसिक आरोग्याच्यादृष्टीने महत्व, तसेच विद्यार्थ्यांनी आपल्या दैनंदिन जीवनामध्ये योगसाधना केल्यास होणारे विविध फायदे विशद केले. महाविद्यालयाच्या दैनंदिन अभ्यासक्रमात योगाभ्यासाचा असणारा समावेश, तसेच त्याची व्याप्ती वाढावी यासाठी भविष्यातील योजनांबाबत माहिती दिली. याप्रसंगी उपप्राचार्य डॉ. सरदार पाटील, नेव्ही एनसीसी ऑफिसर लेफ्टनंट प्रा. उदय भाट्ये, आर्मी एनसीसी केअर टेकर प्रा. सानिका भालेकर, एनएसएस कार्यक्रमाधिकारी प्रा. सुनील सोनवणे, तसेच एनएसएस स्वयंसेवक आणि एनसीसी कॅडेट्स बहुसंख्येने उपस्थित होते.
कनिष्ठ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाने प्रा. संदीप मुळ्ये यांचे ‘विद्यार्थ्यांकरता योग क्रियांचे महत्त्व व उपयुक्तता’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन केले होते. प्रा. मुळये यांनी आपल्या मार्गदर्शनात प्राचीन भारतीय परंपरेतील योगसाधनेचे महत्त्व, आधुनिक जीवनशैलीसाठी योगाभ्यासाची असणारी गरज याबाबत सखोल माहिती दिली. विद्यार्थ्यांसाठी असणारे योगाभ्यासाचे महत्व व त्याची उपयुक्तता सविस्तर विशद केली. निरोगी जीवनशैलीसाठी योगसाधनेची असणारी उपयुक्तता व योग चिकित्सा सर्व मानवांसाठी कशी उपयुक्त आहे, याबाबतचा सखोल आढावा घेतला. यावर्षीच्या “एक पृथ्वी, एक आरोग्यासाठी योग” या जागतिक योग दिनाच्या संकल्पनेविषयी समर्पक माहिती दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एनएसएस कार्यक्रमाधिकारी प्रा. सीमा कोरे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. मयुरेश राणे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. स्वप्नाली झेपले आणि प्रा. शिवराज कांबळे यांनी मेहनत घेतली.
*फोटो* १. पोस्टर स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांसोबत प्राचार्य डॉ. तेंडोलकर, उपप्राचार्य डॉ. पाटील आणि उपस्थित प्राध्यापक.
२. योग प्रात्यक्षिके सादर करताना सहभागी विद्यार्थी.