
सुभेदार प्रदीप चाळके ट्रस्टच्या सहयोगाने संपन्न झालेल्या कार्यक्रमास माजी जि. प. अध्यक्ष राजेंद्र महाडिक, माजी जि. प. अध्यक्ष रोहन बने यांची प्रमुख उपस्थिती.
डिंगणी – सुभेदार प्रदीप चाळके ट्रस्टच्या पुढाकाराने डिंगणी येथील गडदुमेश्वर मंदिरात माता-भगिनींच्या उत्साहपूर्ण उपस्थितीत जागतिक महिला दिन संपन्न झाला. यावेळी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या महिलांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
सुभेदार प्रदीप चाळके ट्रस्ट डिंगणी पंचक्रोशीत विविध शैक्षणिक उपक्रम राबवून ग्रामीण भागातील गुणवंत विद्यार्थ्यांना मंच उपलब्ध करून देण्यात, त्यांचा यथोचित कौतुक सोहळा करण्यात अग्रेसर असल्याचे नेहमीच पहायला मिळते. मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून ट्रस्टच्या वतीने घेण्यात आलेल्या केंद्रस्तरीय निबंध स्पर्धेत कौतुकास्पद कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा आज मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी श्री. रोहन बने यांनी महिला दिनाच्या शुभेच्छा देत विद्यार्थ्यांचे कौतुक केले. राष्ट्रीय महिलांच्या वेषभूषा करणाऱ्या विद्यार्थिनींचे कौतुक श्री. राजेंद्र महाडिक यांनी केले. तसेच उत्तमोत्तम यश संपादन करण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
महिला दिनाच्या औचित्यावर डिंगणी खाडेवाडीच्या अंगणवाडी सेविका सौ. सानिया जोगळे यांनी मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त केले. यामध्ये त्यांनी केंद्र सरकारच्या ‘पोषण भी, पढाई भी’ या महत्त्वाकांक्षी व कल्याणकारी योजनेची आवर्जून माहिती देत यामध्यमातून विद्यार्थ्यांना मिळणारे लाभ उपस्थितांसमोर विषद केले. याव्यतिरिक्त त्यांनी लेक लाडकी योजनेची माहिती देऊन या योजनेमुळे आपल्या लेकीबाळी सक्षम होणार असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केंद्रप्रमुख श्री. मदन वाजे यांनी केले. सुभेदार चाळके चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने संस्थेचे सचिव सुधीर चाळके यांनी उपस्थितांचे आभार मानत कार्यक्रमाचा समारोप केला. ग्रामस्थ, शिक्षक व अन्य सहयोगी कार्यकर्त्यांच्या योगदानामुळे कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.