पुष्पा2 च्या प्रदर्शनाला हैदराबादेत तुफान गर्दी; चेंगराचेंगरीत महिला ठार, मुलगा गंभीर…

Spread the love

लाखो दिलाची धडकन असलेली अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि सुपरस्टार अभिनेता अल्लू अर्जुन यांचा पुष्पा2 हा चित्रपट प्रदर्शित झाला. मात्र चाहत्यांनी केलेल्या चेंगराचेंगरीत महिलेचा मृत्यू झाला.

हैदराबाद :सुपरस्टार अभिनेता अल्लू अर्जुन याचा बहुचर्चित पुष्पा 2 हा चित्रपट 5 डिसेंबरला प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अभिनेता अल्लू अर्जुन आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना हे चित्रपटगृहात उपस्थित होते. मात्र यावेळी अभिनेता अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांना पाहण्यासाठी चाहत्यांनी तुफान गर्दी केल्यानं प्रचंड चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाला असून त्यांचा मुलगा गंभीर जखमी झाला.

चेंगराचेंगरीत महिला ठार, मुलगा गंभीर जखमी :

बुधवारी रात्री 9.30 वाजताच्या सुमारास हैदराबादच्या आरटीसी क्रॉसरोड इथल्या संध्या थिएटरमध्ये पुष्पा-2 शोसाठी चित्रपटाचा अभिनेता अल्लू अर्जुन आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना यांनी हजेरी लावली. मात्र त्यांची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांनी तुफान गर्दी केली. या गर्दीमुळे या परिसरात चेंगराचेंगरी झाली. मात्र चेंगराचेंगरी रोखण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला. या चेंगराचेंगरीत रेवती (35) आणि त्यांचा मुलगा श्रीतेजा (9) खाली पडले. हे दोघंही जमावाच्या पायाखाली चिरडल्यानं गंभीर जखमी झाले. या दोघांना बेशुद्ध अवस्थेत पोलिसांनी बाजुला घेऊन सीपीआर दिला. त्यानंतर त्यांना तत्काळ आरटीसी क्रॉसरोड येथील खासगी रुग्णालयात हलवण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान रेवती यांचा मृत्यू झाला. सध्या मुलाची प्रकृती चिंताजनक असल्यानं त्याला निम्स इथं हलवण्यात आलं, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

कुटुंब आलं होतं पुष्पा 2 चित्रपट पाहण्यासाठी :

बहुचर्चित पुष्पा हा चित्रपट पाहण्यासाठी रेवती यांचं कुटुंब आलं होतं. मात्र चित्रपटाचा अभिनेता अल्लू अर्जुन आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना हे दोघं आल्यानं चाहत्यांनी प्रचंड गर्दी केली. ही गर्दी रोखण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला. मात्र चेंगराचेंगरी झाल्यानं रेवती यांचा बळी गेला. रेवती यांच्या निधनानं त्यांच्या कुटुंबीयांना प्रचंड मोठा धक्का बसला. या चेंगराचेंगरीत इतर नागरिकही किरकोळ जखमी झाले. याप्रकरणी चिक्कडपल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page