१९ डिसेंबर/रत्नागिरी: ॲल्युमिनीयम प्रकल्प बाधित शेतकरी संघाच्या मागण्या पूर्ण झाल्या पाहिजेत, याकरिता शेवटपर्यंत तुमच्यासोबत आहे, न्याय मिळेपर्यंत मी सोबत आहे, असे सांगत माजी आमदार बाळ माने यांनी मंगळवारी सायंकाळी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. विधीमंडळ अधिवेशन सुरू असल्याने ते संपल्यानंतर आपण या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करूया, सध्या हे आंदोलन तात्पुरते स्थगित करावे, अशी विनंती बाळ माने यांनी आंदोलनकर्त्यांना केली. त्यांच्या या विनंतीला मान देत हे धरणे आंदोलन तात्पुरते स्थगित केले आहे.
सध्या विधीमंडळाचे अधिवेशन नागपूर येथे सुरू असल्याने मंत्रीमंडळ त्यात व्यस्त आहे. न्यायालयातील प्रकरण, शासनाची भूमिका यामधून प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळेपर्यंत मी तुमच्या सोबत राहणार आहे, अशी भूमिका बाळ माने यांनी जाहीर केल्यानंतर आंदोलनकर्त्यांनी आंदोलन काही काळ स्थगित करण्याचा निर्णय घेतला. १९७५ मध्ये केंद्र सरकारने ८३५ शेतकऱ्यांकडून १२०० एकर जमीन अधिग्रहित केली. परंतु प्रकल्प झाला नाही. त्यानंतर दुसऱ्या प्रकल्पासाठी ही जमीन हस्तांतरित करण्यात आली. तोही प्रकल्प झाला नाही. या स्थितीत शेतकऱ्यांना कवडीमोल दराने जागेचा मोबदला मिळाला. मात्र कोणताही प्रकल्प न झाल्यामुळे जमिन परत मिळण्याची मागणी शेतकरी संघाने लावून धरली आहे.
शेतकरी संघाची ही बाजू माजी आमदार बाळ माने यांनी जाणून घेतली. कालही या आंदोलनकर्त्यांची भेट बाळ माने यांनी घेतली होती. त्यानंतर आज दुसऱ्या दिवशीही आंदोलन सुरू झाले. सरकारी यंत्रणा, अधिकारी वा लोकप्रतिनिधींनी या आंदोलनकर्त्यांची भेट घेतली नाही. सायंकाळी शिवसेना (उबाठा) पदाधिकारी प्रमोद शेरे, प्रशांत साळुंखे यांनी भेट घेऊन व्यथा जाणून घेतली. त्यानंतर बाळ माने यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन त्यांची समजूत काढली. न्याय मिळेपर्यंत लढा द्यायचा परंतु सध्या अधिवेशनामुळे मंत्रीमंडळ व्यस्त असल्याने या प्रश्नी अधिवेशन संपल्यानंतर तोडगा काढू. प्रकरण कुठे अडकले आहे, त्याची माहिती घेऊन न्याय देऊया, असे सांगितले. त्यानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले. या वेळी विलास सावंत (शिवरेकर), रणजीत सावंत, सलील डाफळे, राजेंद्र आयरे, रेश्मा मलुष्टे, अंजुम पडवेकर, विजय आलीम, राजेंद्र सावंत, फरिदा हकीम, यास्मीन पडवेकर आदींसह शेतकरी संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.
बाळ माने आगे बढो..
मागच्या वेळी आंदोलनावेळी स्थानिक लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केल्याची खंत आंदोलनकर्त्यांनी बोलून दाखवली. परंतु आज माजी आमदार बाळासाहेब माने यांनी लक्ष्य घातल्याने त्यांनी आंदोलनकर्त्यांनी समाधान व्यक्त केले. आम्ही माने साहेबांच्या पाठिशी आहोत, असे सांगत बाळ माने आगे बढो, हम तुम्हारे साथ है अशा घोषणाही दिल्या.