एनडीआरएफ टीमच्या सहाय्याने महावितरणने केला २२ गावातील वीज पुरवठा सुरळीत….

Spread the love

२२ जुलै/रत्नागिरी– खेड तालुक्यात १९ व २० जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टी दरम्यान महावितरण कंपनीच्या खेड विभागांतर्गत येणाऱ्या लोटे उपविभागातील कर्जी शाखेतील ३३/११ के.व्ही. आंबवली उपकेंद्राला विद्युत पुरवठा करणारी मुख्य ३३ के.व्ही. वाहिनी मौजे आंबवली येथे जगबुडी नदीपात्रात तुटून पडली होती व त्यामुळे २२ गावांतील वीज पुरवठ्यावर परिणाम झाला होता.

कार्यतत्पर महावितरण कर्मचाऱ्यांकडून विद्युत वाहिनी पुनर्जोडणीसाठी प्रयत्न झाला, परंतु नदीतील पाण्याचा प्रवाह व नदीच्या पात्राची सुमारे ३०० मीटर रुंदी यामुळे काम करणे अवघड होत होते.
याची कल्पना लोटे उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता निलेश नानोटे यांनी कार्यकारी अभियंता विशाल शिवतारे यांना दिली असता, श्री. शिवतारे यांनी खेड तालुक्याच्या प्रांताधिकारी राजश्री मोरे व महावितरणच्या रत्नागिरी परिमंडळ कार्यालयाचे नवनियुक्त अधीक्षक अभियंता स्वप्नील काटकर यांच्या मदतीने जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांना या गंभीर परिस्थितीची जाणीव करून दिली.

जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी क्षणाचाही विलंब न लावता, चिपळूण येथे उपस्थित एनडीआरएफ टीम या कामासाठी तैनात केली. एनडीआरएफ टीमसह त्यांच्या ४ होड्या, महावितरण कर्मचारी व स्थानिक नागरिक यांच्यामार्फत दि. २१ पासून दि. २२ जुलै २०२३ रोजी रात्री उशिरा पर्यंत वीज पुरवठा पूर्ववत करण्याचे काम चालू होते.

या कामात स्थानिक रहिवासी दाऊद मुनके, खालील भाई परकार , मोअज्जम पारकर व इतर रहिवासी यांनी आपल्या २ होड्यांसह सहभाग घेऊन मोलाची मदत केली.
नदीतील पाण्याचा प्रवाह व कामाचा आवाका बघता एनडीआरएफचे असिस्टंट कमांडर जस्टीन जोसेफ आणि निरीक्षक अशोक कुमार आणि पथकाने केलेल्या या अत्यंत जोखमीच्या कामाचे कौतुक स्थानिक स्तरावरून करण्यात येत आहे. जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी या पथकाचे अभिनंदन केले आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page