पुणे: राज्यभरात सुरु असलेला मुसळधार पावसाचा जोर कायम आहे. मुंबई, कोकण, विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागांत मुसळधार पाऊस होत आहे. हवामान विभागाने राज्यातील काही जिल्ह्यास गुरुवारी रेड अलर्ट दिला आहे. तसेच काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट तर काही ठिकाणी यलो अलर्ट दिला आहे.
मुंबईत काय आहे परिस्थिती
मुंबईत गुरुवारी दुपारपर्यंत अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. मुंबईत सर्व शाळा महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर केली आहे. मुंबईत बुधवारी झालेल्या मुसळधार पावसानंतर गुरुवारी पहाटेपासून रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे. मुंबईला रेड अलर्ट दिल्यामुळे कामाशिवाय घरातून बाहेर पडू नये, असे आवाहन मुंबई आयुक्त इकबालसिंग चहल यांनी केले आहे. ठाणे जिल्हा परिषदेने पहिली ते बारावीपर्यंतच्या शाळांना सुट्टी जाहीर केली आहे.
का सुरु आहे पावसाचा जोर
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्याची वाटचाल वायव्य दिशेकडे होत आहे. त्यामुळे अजून पुढील तीन, चार दिवस राज्यात पावसाचा जोर कायम राहणार असल्याचे पुणे हवामान विभागाचे प्रमुख के.एस.होसाळीकर यांनी वर्तवली आहे.
रत्नागिरी, रायगड जिल्ह्यास पुन्हा रेड अलर्ट
पुणे जिल्ह्यास गुरुवारी रेड अलर्ट दिला आहे. पुण्यातील घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस सुरु आहे. गडचिरोली, रायगड, रत्नागिरी, सातार जिल्ह्यास रेड अलर्ट दिला आहे. ठाणे, पालघर, अमरावती जिल्ह्यास ऑरेंज अलर्ट दिला आहे. कोल्हापुरात पावसाने विश्रांती घेतली आहे. पंचगंगा नदीची पाणी पातळी गेल्या दहा तासांपासून स्थिर आहे. यामुळे राधानगरी धरणाचा स्वयंचलित दरवाजा बंद करण्यात आले.