अजित पवारांनी कार्यकर्त्यांना सुनावले…

मुंबईत ‘लोक माझे सांगाती’ या आपल्या राजकीय आत्मकथेच्या सुधारित आवृत्तीच्या प्रकाशन कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांच्या राजकीय जीवनाबाबत मोठी घोषणा केली. प्रदीर्घ कालावधीनंतर थांबायचा विचार करणे आवश्यक आहे. यामुळे मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय घेतोय, असं शरद पवार यांनी जाहीर केलं. शरद पवारांच्या निर्णयानंतर उपस्थित कार्यकर्ते आणि नेतेमंडळींना अश्रू अनावर झाले. जयंत पाटील यांनी शरद पवारांनी निर्णय मागे न घेतल्यास आपणही राजीनामा देऊ, असे म्हटले. यावरुन राष्ट्रवादीचे आमदार आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना सुनावले आहे.
“सगळ्यांच्या भावना शरद पवारांनी ऐकल्या आहेत, पाहिल्या आहेत. तुम्ही गैरसमज करून घेताय. शरद पवार अध्यक्ष नाहीत म्हणजे पक्षात नाहीत असं नाही. सध्या खर्गे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत, पण सोनिया गांधीकडे बघून काँग्रेस चालत आहे. काळानुरूप काही निर्णय घ्यावे लागतात. साहेबांच्या डोळ्यांसमोर नवीन झालेला अध्यक्ष तुम्हाला का नकोय? मला तुमच कळत नाही. आपण साहेबांच्या हाकेला धावून जाणारच आहोत. त्यांच्याशी चर्चा करूनच पुढचे निर्णय घेतले जातील. कुणीही भावनिक होण्याचं कारण नाही. हा प्रसंग कधी ना कधी येणार होता. ते कालच निवृतबाबत जाहीर करणार होते.परंतु, वज्रमूठ सभेमुळे एक दिवस पुढं ढकलण्यात आलं. त्यांच्या मनात जे आहे, त्या गोष्टी आपण करू. त्याबाहेर कुणीही काहीही करणार नाही”, असंही अजित पवार म्हणाले.
पुढे अजित पवार म्हणाले की, शरद पवार म्हणजेच पक्ष आहे. ते आपल्या मार्गदर्शन करीत राहणार आहेत. उद्या पक्षाचा नवा अध्यक्षही शरद पवारांच्याच मार्गदर्शनाखाली काम करेल. तुम्हाला असं का वाटतंय की ते अध्यक्ष राहिले तरच अल्पसंख्याकांच्या पाठिशी राहतील. आपला परिवार असाच पुढे चालत राहणार आहे. भावनिक होऊ नका”, असं अजित पवार म्हणाले.