
छत्रपती संभाजीनगर- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी वेळोवेळी विविध मुद्द्यांवर केंद्रातील मोदी सरकारवर शाब्दिक हल्ला चढवला आहे.मात्र, अशातच पत्रकारांनी शरद पवारांना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील सरकारच्या ९ वर्षांच्या कालखंडात मंत्रिमंडळातील कोणता नेता आवडतो? असा प्रश्न विचारला. यानंतर शरद पवारांनी मोदी सरकारमधील आवडत्या नेत्याचं नाव सांगत कारणंही नमूद केली. ते बुधवारी (७ जून) छत्रपती संभाजीनगरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
शरद पवार म्हणाले, ‘काही लोकांचं काम चांगलं आहे. उदाहरणार्थ नितीन गडकरी. मी पाहतो की, त्यांना विकासाच्या कामात रस आहे. शेवटी शासन तुमच्या हातात आल्यावर सरकारने काही तरी ‘रिझल्ट’ दिला पाहिजे. त्यात नितीन गडकरी पुढे आहेत. त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे ते पक्षीय दृष्टिकोन ठेवत नाहीत’.
‘असा अनुभव केवळ गडकरींबद्दलचाच आहे. आपण नितीन गडकरींना एखादा प्रश्न सांगितला, तर ते तो प्रश्न कोण सांगतोय यापेक्षा तो प्रश्न किती महत्त्वाचा आहे याकडे लक्ष देतात. ही एक समंजसपणाची गोष्ट आहे. मात्र, असा अनुभव केवळ त्यांच्याबद्दलचाच आहे’, असंही शरद पवारांनी सांगितलं.