गगनयान मोहिमेसाठी इस्रोने निवड केलेले चार अंतराळवीर कोण आहेत? ही निवड नेमकी कशी करण्यात आली?..

Spread the love

निवडलेले चार अंतराळवीर बेंगळुरू येथे प्रशिक्षण घेत आहेत. यापूर्वी त्यांनी १३ महिन्यांच्या कालावधीसाठी रशियामधील गॅगारिन कॉस्मोनॉट ट्रेनिंग सेंटरमध्ये सखोल प्रशिक्षण घेतले आहे.

गगनयान मोहिमेसाठी पंतप्रधान मोदी यांनी चार अंतराळवीरांच्या नावाची घोषणा केली.

चांद्रयान मोहीम यशस्वी झाल्यानंतर इस्रो गगनयान मोहिमेसाठी सज्ज झाले आहे. गगनयान ही मानवयुक्त अंतराळ मोहीम आहे. २००७ सालीच इस्त्रोने या अंतराळ कार्यक्रमाची सुरुवात केली होती. २०२० मध्ये या मोहिमेची अधिकृत घोषणा करण्यात आली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गगनयान मोहिमेसाठी पाठवण्यात येणार्‍या चार अंतराळवीरांच्या नावाची घोषणा केली.

ग्रुप कॅप्टन प्रशांत बालकृष्णन नायर, ग्रुप कॅप्टन अजित कृष्णन, ग्रुप कॅप्टन अंगद प्रताप आणि विंग कमांडर शुभांशु शुक्ला या चौघांच्या नावांची घोषणा करत त्यांना मोहिमेसाठी शुभेच्छा दिल्या. “देशाला चार गगनयान अंतराळवीरांची आज माहिती मिळाली आहे. ही चार नावे किंवा चार माणसं नसून या चार शक्ती आहेत; ज्या १४० कोटी भारतीयांच्या आकांक्षा अवकाशात घेऊन जातील”, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. निवड करण्यात आलेले अंतराळवीर कोण आहेत? गगनयान मिशन नक्की काय आहे? आणि या अंतराळवीरांची निवड नेमकी कशी करण्यात आली? याबद्दल जाणून घेऊ.

ग्रुप कॅप्टन प्रशांत बालकृष्णन नायर, ग्रुप कॅप्टन अजित कृष्णन, ग्रुप कॅप्टन अंगद प्रताप आणि विंग कमांडर शुभांशु शुक्ला हे भारतीय वायुसेनेचे प्रशिक्षित वैमानिक आहे.

निवड करण्यात आलेले अंतराळवीर कोण आहेत?..

ग्रुप कॅप्टन प्रशांत बालकृष्णन नायर, ग्रुप कॅप्टन अजित कृष्णन, ग्रुप कॅप्टन अंगद प्रताप आणि विंग कमांडर शुभांशु शुक्ला हे बेंगळुरूमधील एअरक्राफ्ट अँड सिस्टीम्स टेस्टिंग एस्टॅब्लिशमेंट (एएसटीई)चे भारतीय वायुसेनेचे प्रशिक्षित वैमानिक आहेत. चारही जणांकडे प्रशिक्षित वैमानिक म्हणून अनुभव आहे, ज्यामुळे त्यांची निवड गगनयान मोहिमेसाठी योग्य मानली जात आहे. ‘टाईम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तानुसार, नायर, कृष्णन आणि प्रताप यांची नावे काही काळापूर्वीच निश्चित करण्यात आली होती, तर शुक्ला यांचे नाव या मोहिमेत नवीन आहे. ग्रुप कॅप्टन नायर यांनी नॅशनल डिफेन्स अकादमीमधून पदवी प्राप्त केली. १९९९ मध्ये ते एअर फोर्समध्ये कमिशन्ड ऑफिसर म्हणून रुजू झाले. ‘मातृभूमी’च्या वृत्तानुसार ते सुखोई फायटर जेटचं सारथ्य करतात.

विशेष म्हणजे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (इस्रो)ने २०१९ मध्ये सांगितले होते की, या मोहिमेसाठी येणारे अंतराळवीर प्रशिक्षित वैमानिक असतील. कारण या वैमानिकांकडे असणार्‍या अनुभवाचा फायदा त्यांना या मोहिमेत होईल. पंतप्रधान मोदी यांनी तिरुवनंतपूरममधील विक्रम साराभाई स्पेस सेंटर (व्हीएसएससी) ला भेट देत, गगनयान मोहिमेसाठी अंतराळवीरांची नावे जाहीर केली. या कार्यक्रमात बोलताना, १९८४ मध्ये अंतराळात गेलेल्या विंग कमांडर राकेश शर्मा (निवृत्त) यांचा उल्लेख करत मोदी म्हणाले, “चार दशकांनंतर भारतीय अंतराळात जाण्यासाठी सज्ज झाले आहेत. यावेळी वेळ आणि रॉकेटदेखील आपले असेल.”

अंतराळवीरांचे प्रशिक्षण…

निवडलेले चार अंतराळवीर बेंगळुरू येथे प्रशिक्षण घेत आहेत. यापूर्वी त्यांनी १३ महिन्यांच्या कालावधीसाठी रशियामधील गॅगारिन कॉस्मोनॉट ट्रेनिंग सेंटरमध्ये सखोल प्रशिक्षण घेतले आहे. अनपेक्षित ठिकाणी क्रू मॉड्यूल पृथ्वीवर परतल्यास, बर्फ आणि वाळवंट यासारख्या वातावरणात राहायचे प्रशिक्षणही अंतराळवीरांनी घेतले आहे.

इस्रो, डिफेंस रिसर्च ॲण्ड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (डीआरडीओ) आणि भारतीय वायु दलाच्या अनुभवी तज्ज्ञांनी प्रशिक्षणाचं स्वरुप ठरवले आहे. ‘न्यूज ९ लाईव्ह’च्या वृत्तात असे म्हटले आहे की, प्रशिक्षणाचा अभ्यासक्रम विंग कमांडर राकेश शर्मा (निवृत्त) आणि एअर कमोडोर रवीश मल्होत्रा (निवृत्त) यांनी तयार केला आहे. सोव्हिएत इंटरकॉसमॉस प्रोग्रामसाठी घेतलेल्या प्रशिक्षणावर हा अभ्यासक्रम आधारित आहे. अंतराळवीर शारीरिक योग्यतेचे प्रशिक्षण, सिम्युलेटर प्रशिक्षण आणि फ्लाइट सूट प्रशिक्षणदेखील घेत आहेत.

गगनयान मोहीम..

४०० किलोमीटरच्या लो-अर्थ ऑर्बिटमध्ये (एलईओ) अंतराळवीर पाठवणे आणि त्यांना हिंद महासागरात सुरक्षितपणे परत आणणे, हे गगनयानचे उद्दिष्ट आहे. प्रजासत्ताक दिनाच्या भाषणात लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मोहिमेची घोषणा केली होती. गगनयान मोहीम २०२२ मध्ये प्रक्षेपित होणार होती. परंतु, कोविड-१९ साथीच्या आजारामुळे मोहिमेला उशीर झाला. इस्रो आता २०२५ ला प्रक्षेपण करण्याच्या विचारात आहे. इस्रोची ही पहिली मानवी मोहीम यशस्वी झाल्यास भारताच्या प्रगतीसाठी हे खूप महत्त्वाचे ठरेल आणि सोव्हिएत युनियन, युनायटेड स्टेट्स आणि चीन नंतर अंतराळ मोहिमेत भारत चौथ्या क्रमांकावर येईल. ‘रॉयटर्स’च्या वृत्तात असे म्हटले आहे की, मिशनसाठी सुमारे नऊ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page