बुलढाणा – बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यात असलेल्या विश्वी या गाव शिवारात असलेल्या शेतात भक्षाचा पाठलाग करत असताना अंदाज न आल्याने बिबट्या खोल विहिरीत पडला.सकाळी शेतमालक किसन खंडारे हे शेतात गेले असता त्यांना विहिरीतून आवाज आला. तेव्हा, त्यांनी विहिरीत डोकाऊन पाहिले असता एक बिबट्या विहिरीत पडलेला दिसला.
यानंतर किसन खंडारे यांनी तातडीने गावकऱ्यांच्या सहकार्याने वन विभागाला कळविले. अवघ्या तासाभरात वन विभागाची रेस्क्यू टीम घटनास्थळी पोहोचली व त्यांनी विहिरित एक शिडी सोडली व ग्रामस्थांना दूर अंतरावर थांबविले. बिबट्याने त्या शिडीचा आधार घेतला आणि तो विहिरी बाहेर पडला व आपल्या अधिवासात धूम ठोकून निघून गेला. त्यामुळे बिबट्याला जीवदान मिळाले आहे.
सध्या तालुक्यात या घटनेची चर्चा सुरू असून भीतीचे वातावरण देखील स्थानिक नागरिकांमध्ये आहे.आपल्या शेतापर्यंत बिबट्या पोहचल्याने शेतकरी देखील चिंतेत पडले आहे. विश्वी या गावापासून अवघ्या ३० किलोमीटर अंतरावर अभयारण्य आहे.त्यामुळे येथील शेतकरी भीतीच्या सावटाखाली राहून शेती करत असतात.