भारतीय वंशाचा रचिन रवींद्रचं आजोळ भारतात बंगळुरू इथं आहे. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यासाठी तो इथं आला तेव्हा त्याच्या आजीने त्याची मूळ घरी दृष्ट काढली, तो व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहे.
बेंगलोर/ जनशक्तीचा दबाव- भारतीय वंशाचा रचिन रवींद्रचं आजोळ भारतात बंगळुरू इथं आहे. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यासाठी तो इथं आला तेव्हा त्याच्या आजीने त्याची मूळ घरी दृष्ट काढली, तो व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहे.
न्यूझीलंडचा २३ वर्षीय क्रिकेटपटू रचिन रवींद्र आपला पहिलाच विश्वचषक खेळतोय आणि क्रिकेटमधील ही सर्वोच्च स्पर्धा आपल्या बॅटने तो गाजवतोयही. सध्या ९ साखळी सामन्यांतून ५६४ धावा करत स्पर्धेतला तो सर्वात यशस्वी फलंदाज ठरला आहे. त्याचे पालक दोघेही भारतीय आहेत. त्याचं नावंही त्याच्या वडिलांनी राहुल द्रविड आणि सचिन तेंडुलकर यांचं नाव जोडून ठेवलं आहे.
त्यामुळे भारतात आल्यावर सामना जेव्हा बंगळुरूत होता, तेव्हा रचिनने आपल्या मूळ घराला, जिथे त्याचे आजी-आजोबा राहतात, भेट दिली. त्याच्या आजीने तेव्हा भारतीय पद्धतीने त्याचं औक्षण करून त्याची दृष्टही काढली. हा व्हीडिओ खुद्द रचिननेच आपल्या ट्विटर अकाऊंटवर टाकला आहे आणि २४ तासांच्या आत हो व्हायरलही होतोय.
रचिनचा हा व्हीडिओ आतापर्यंत सहा लाख लोकांनी पाहिलाय. ‘असं सुंदर कुटुंबं लाभल्याबद्दल मी देवाचे आभार मानतो. आजी-आजोबांचे आशीर्वाद आणि आठवणी आपल्याबरोबर कायम राहतात,’ असा संदेश रचिनने या व्हीडिओबरोबर लिहिला आहे.
रचिन रवींद्रची ही पहिलीच विश्वचषक स्पर्धा आहे आणि यात त्याने आतापर्यंत ३ शतकं ठोकली आहेत. नुकताच त्याने आयसीसीचा ऑक्टोबर २०२३ मधील सर्वोत्तम क्रिकेटपटू होण्याचा मानही मिळवला आहे. नुकत्याच बंगळुरूत झालेल्या श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यातही रचिनने ४२ धावा केल्या.
न्यूझीलंडचा संघ साखळी सामन्यांनंतर चौथ्या क्रमांकावर राहील अशी दाट शक्यता आहे आणि तसं झालं तर संघाचा उपांत्य फेरीचा सामना भारताविरुद्ध १५ नोव्हेंबरला मुंबईत होणार आहे.