ठाणे : प्रतिनिधी (निलेश घाग ) ठाणे महापालिकेचा २०२३-२४ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प मंगळवारी आयुक्त अभिजीत बांगर यांच्याकडून सादर होणार असून महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सादर होणाऱ्या या अर्थसंकल्पास विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. दुसरीकडे राज्यातील सत्तांतरानंतर ठाण्याचे नेते एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहेत. ठाणे शहरासाठी राज्याच्या तिजोरीतून सढळ हस्ते निधी उपलब्ध करून दिला जात आहे. त्यामुळे ‘मुख्यमंत्र्यांच्या ठाण्या’च्या अर्थसंकल्पाबद्दल ठाणेकरांमध्ये विशेष कुतूहल निर्माण झाले आहे. सध्या महापालिकेमध्ये प्रशासकीय राजवट लागू असल्यामुळे स्थायी समिती आणि सर्वसाधारण सभेऐवजी आयुक्त थेट अर्थसंकल्प सादर करणार आहेत. आयुक्त अभिजीत बांगर ठाणे महापालिकेतील त्यांच्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प सादर करणार असल्यामुळे त्यांच्या कार्यपद्धतीचीही छाप अर्थसंकल्पावर दिसण्याची शक्यता आहे.
सप्टेंबर महिन्यात ठाणे महापालिकेच्या आय़ुक्तपदाचा पदभार अभिजीत बांगर यांनी स्वीकारला. आयुक्त बांगर यांनी ठाणे शहरामध्ये आल्यापासून शहर सौंदर्यीकरण, स्वच्छता, शौचालये, खड्डे आणि रस्ते या घटकांवर सर्वाधिक लक्ष देऊन त्यासाठी विशेष प्रयत्न सुरू केले आहेत. अर्थसंकल्पातून भविष्यातील ठाणे शहराचे नियोजन करण्याची संधी आय़ुक्त अभिजीत बांगर यांच्या हाती असून त्याचा कसा उपयोग करतात ते आजच्या अर्थसंकल्पातून समोर येणार आहे.
ठाण्याचे नेते राज्याच्या सर्वोच्चपदी असल्यामुळे यंदा अर्थसंकल्पामध्ये एक हजार कोटीहून अधिक वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. यंदाचा अर्थसंकल्प चार हजार कोटींचा टप्पा ओलांडण्याची शक्यता आहे. या माध्यमातून निवडणुकांच्या दृष्टीने अनेक आकर्षक घोषणांची अपेक्षा ठाणेकरांना लागली आहे
ठाणे महापालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारावरील खर्च वाढला आहे. शासनाकडून प्राप्त होणाऱ्या जीएसटी अनुदानातून हा खर्च भागवला जात असून त्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते. दुसरीकडे ठेकेदारांचे २८०० कोटींपर्यंतची देणी शिल्लक आहेत. त्यामुळे महापालिका आयुक्त अनुदानातूनच हा खर्च भागवणार की महापालिका यासाठी कर्ज घेणार, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी जणशक्तीचा दबावर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा मराठी न्यूज वेबसाइट जनशक्तीचा दबावर.
भारत सरकार मान्यताप्राप्त वृत्तपत्र RNINO.MAHMAR2014/59698
दबाव जनशक्तीचा ……निर्धार लोकशाहीच्या सन्मानाचा