
कल्याणमधील मराठी तरुणीला मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली. यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली. या प्रकरणात पीडित तरुणीने मानपाडा पोलिसांच्या तपासावर आता तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. यासोबतच काही गंभीर आरोपही केली आहेत. कल्याणच्या मराठी तरुणीवर झालेल्या मारहाण प्रकरणात मोठा ट्विस्ट, तरुणीची सर्वात मोठी मागणी काय? पुढे काय होणार?
कल्याण : कल्याणमधील तरुणीला मारहाण केल्याच्या प्रकरणात पीडित तरुणीने मानपाडा पोलिसांच्या तपासावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तपास अधिकारी मनीषा वरपे यांच्याकडून तपास काढून घेऊन तो दुसऱ्या सक्षम अधिकाऱ्याकडे वर्ग करण्याची मागणी पीडितेने आपल्या कुटुंबीयांसह अप्पर पोलीस आयुक्त आणि डीसीपींकडे पत्राद्वारे केली आहे. तपास अधिकारी मनीषा वरपे या राजकीय दबावाखाली काम करत असल्याचा आणि आरोपीला अप्रत्यक्षपणे मदत करत असल्याचा आरोप पीडितेने केला आहे. यामुळे मोठी खळबळ उडालीये.
तपास अधिकाऱ्यांवरच पीडितेचे गंभीर आरोप…
मिळालेल्या माहितीनुसार, दुपारच्या सुमारास तपास अधिकारी मनीषा वरपे यांनी पीडितेला, आरोपी 99 टक्के बाहेर आल्यावर तुम्हाला त्रास देणार नाही, तो बिहारला निघून जाईल, असे सांगितल्याचा गंभीर आरोप पीडितेने केला आहे. तपास अधिकारी वरपे यांनी तपासकामात हलगर्जीपणा केल्याचा आणि न्यायालयात देखील पीडितेची बाजू सक्षमपणे मांडली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.
पीडितेने सांगितली संपूर्ण व्यथा…
पीडित तरुणीने माध्यमांशी बोलताना सांगितले की, आमच्या तपास अधिकारी आज आमच्याकडे आल्या आणि त्या बोलत होत्या की, आरोपी 99 टक्के बाहेर आल्यावर तुला त्रास देणार नाही… आम्ही त्यांना बोललो, आम्हाला हे लिहून द्या. त्याला (आरोपीला) कडक शिक्षा झाली पाहिजे, ही आमची मागणी आहे. तर पीडित तरुणीच्या बहिणीनेही पोलिसांकडून योग्य सहकार्य मिळत नसल्याचे सांगितले. तो (आरोपी) सुटला तर आम्हाला त्रास होऊ शकतो. त्याला कठोर शिक्षा देण्यात यावी, यासाठी आम्ही अर्ज केला आहे आणि नवीन तपास अधिकारी द्यावा, अशी मागणी केली.
पीडितेच्या बहिणीचे आरोपीच्या वर्तनावरही प्रश्नचिन्ह…
आमच्या तपास अधिकारी येऊन आम्हाला बोलल्या की, तो सुटून आला तरी आम्हाला काही करणार नाही. त्याची भीती आमच्या मनाला बसली आहे आणि पोलिसांना सांगितलं आहे की, तो सुटून आला तर आम्हाला त्रास देईल, तरी आमचे तपास अधिकारी बोलतात की तो काही करणार नाही, त्याचे घरचे त्याला बिहारला पाठवणार आहेत, असेही तिने सांगितले. पीडितेच्या बहिणीने आरोपीच्या वर्तनावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तो सुटणार नाही, पण काही ना काही करेल याची मला भीती आहे. त्याचं वागणं बघून मला वाटत नाही तो शांत बसेल. न्यायालयामध्ये पोलिसांना आणि माध्यमांना देखील तो ज्या पद्धतीने बोलतोय, त्या पद्धतीने आम्हाला पुढे काही करणार नाही हे कसे सांगता येणार.

वकिलांचा पोलिसांच्या तपासावर आक्षेप…
पीडित तरुणीचे वकील, ॲडव्होकेट हरीश नायर यांनीही मानपाडा पोलिसांच्या तपास पद्धतीवर गंभीर आक्षेप घेतले. न्यायालयातील सुनावणीदरम्यान आरोपीला पोलीस कोठडी मिळवण्यासाठी तपास अधिकारी सक्षमपणे बाजू मांडू शकले नसल्याचे त्यांनी म्हटले. “न्यायालयाने वारंवार विचारणा करूनही कोणत्या मुद्द्यांवर पोलीस कोठडी पाहिजे, हे तपास अधिकाऱ्यांना न्यायालयाला पटवून देता आले नाही. त्यामुळे सदर आरोपीला न्यायालयीन कोठडी मिळाली आहे,” l, “अशाच प्रकारे जर पोलीस तपास चालू राहिला, तर नक्कीच या गुन्ह्यामध्ये पीडितेला न्याय मिळेल अशी आम्हाला खात्री वाटत नाही.
तपास अधिकारी आरोपीला मदत करत असल्याची शंका…
हा आरोपी गुन्हा करतो, कोर्टात जातो, जामीन घेतो, परत येतो आणि पुन्हा वेगळा गुन्हा करतो. त्याचे सीसीटीव्ही बघितले तर पोलीस असोत, पत्रकार असोत, कोर्टात असो, सगळीकडे तो मजुरी करतोय, तमाशा करतोय. यावरून त्याची मानसिकता आणि गैरवर्तन स्पष्टपणे दिसून येते.”या सगळ्यामध्ये जर पोलिसांनी याचा नीट तपास केला नाही, व्यवस्थित पुरावे गोळा केले नाही, सक्षम साक्षीदार जमा केले नाही आणि भक्कम आणि मजबूत अशी चार्जशीट न्यायालयात पाठवली नाही, तर नक्कीच न्यायालय पोलिसांच्या चुकांमुळे त्याला जामीन मंजूर करू शकते,” अशी भीती ॲड. नायर यांनी व्यक्त केली.
सगळीकडे आरोपीची मजुरी सुरूच…
पीडित तरुणी आणि तिच्या बहिणी एकट्याच राहतात, त्यांना आई-वडील नाहीत, एक भाऊ सांगलीला काम करतो. अशा परिस्थितीत आरोपी बाहेर आल्यास त्यांच्या जीविताला धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याचेही ॲड. नायर यांनी म्हटले. आरोपीचा मागील रेकॉर्ड पाहता तो विनाकारण मारामारी करतो, खंडणी गोळा करतो, अशा व्यक्तीपासून या कुटुंबाला किंवा भविष्यात आणखी एखाद्या व्यक्तीला धोका होणार नाही याची कोण हमी घेणार, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.अखेरीस, तपास अधिकारी आरोपींच्या बाजूने तपास करत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर, पीडितेच्या वकिलांनी माननीय अप्पर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, कल्याण आणि माननीय पोलीस उपायुक्त यांना लेखी अर्ज दिला आहे.
तपास अधिकाऱ्यांवर राजकीय दबाव असल्याचा आरोप..
या प्रकरणी तपास अधिकारी मनीषा वरपे कोणत्यातरी राजकीय दबावाखाली किंवा भीतीमध्ये तपास करत आहेत किंवा त्यांना तपासात रस नाही आणि ते अप्रत्यक्षपणे आरोपीला मदत करत आहेत, असे या अर्जात नमूद करण्यात आले आहे. या गंभीर आरोपांमुळे कल्याणमधील या मारहाण प्रकरणाचा तपास आता अधिकच चर्चेत आला आहे. पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी उच्चस्तरीय अधिकाऱ्यांनी या प्रकरणात लक्ष घालावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️
*🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..*
*➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)*
*➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर*