जनशक्तीचा दबाव न्यूज | संगमेश्वर | मे २१, २०२३.
सलग ३ दिवस ‘सा. जनशक्तीचा दबाव’च्या सहकार्याने पिरंदवणे गावातील एका अत्यंत गरीब आणि असहाय्य कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरु आहे. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकुल मंजूर झाले असतानाही केवळ दबावाखाली येऊन ग्रामपंचायत कठपुतळीसारखे वर्तन करत श्री. सदानंद हरिश्चंद्र गुरव आणि त्यांच्या कुटुंबियांना त्रास देत आहे. फिर्यादी अॅड. वसंत गुरव यांनी मा. उच्च न्यायालयात तक्रार नोंदवली असताना स्थगिती देण्याचे काम मा. उच्च न्यायालयाच्याच माध्यमातून होणे रास्त होते. मात्र या प्रकरणी ग्रामपंचायत पिरंदवणेने स्थगिती दिली हे अनाकलनीय आणि संतापजनक आहे. हा मा. उच्च न्यायालयाचा अवमान आहे असे लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून आमचे स्पष्ट मत आहे.
या प्रकरणी लाभार्थ्याला लाभ मिळू नये यासाठी ग्रामपंचायत आग्रही आहे की काय अशी कुजबुज गावात सुरु झाली आहे. केंद्र शासन ‘सबका विकास’ धोरणाचा पुरस्कार करत असतानाच स्थानिक प्रशासन मात्र दुर्बळ घटकांना न्याय देण्यात अपयशी ठरत आहे. गटविकास अधिकारी श्री. भरत चौघुले हे अतिशय सुजाण आहेत. मात्र या प्रकरणी त्यांची भूमिका बोटचेपी असल्याचे निदर्शनास येत आहे. ग्रामसेविका सौ. माया गुरखे प्रत्येकवेळी असंबद्ध उत्तरे देत वेळ मारून नेण्याचा प्रयत्न करतात. ग्रामसेवक संघटना माझ्या पाठीशी खंबीरपणे आहे असे म्हणून प्रश्न करणाऱ्यांना लोकांसमोर भांडखोर सिद्ध करण्यासाठी प्रयत्नशील रहातात. मुळात अशाप्रकारे काही प्रशासकीय संघटना आपल्या कर्तव्यभ्रष्ट अधिकाऱ्यांची बाजू घेऊन गरिबांवर अन्याय होऊ देणार असतील तर अशा संघटना बरखास्त व्हायला हव्यात. किंवा लोकांच्या तक्रारींची शहानिशा करावी आणि आपला कर्मचारी दोषी आढळल्यास तातडीने निलंबन करावे एवढी समज मायबाप प्रशासनाकडे असणे गरजेचे आहे.
ग्रामपंचायत सदस्य निर्ढावलेले आहेत. आमच्याकडे कायदा आहे आमचे कोण काय वाकडे करणार. असे समजून लाभार्थ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी भांडणाऱ्या गावातील सुशिक्षित तरुण व आमचे पत्रकार श्री. योगेश मुळे यांना धमकावणे सुरु झाले आहे. या धमक्यांचा गौप्यस्फोट लवकरच योगेश मुळे करतील अशी अपेक्षा आहे. सदर प्रकरणी ग्रामपंचायत सदस्य श्री. प्रकाश गमरे यांची भूमिका समेट घडवून आणण्याची नसून प्रकरण चिघळवण्याची आहे. गावात अराजक पसरावे यासाठी ग्रामपंचायत सदस्य पुढाकार घेत असल्याचे निंदनीय चित्र येथे अनुभवास येत आहे.
सदर प्रकरणी सरपंच श्री. विश्वास घेवडे हे कान बंद करून, डोळे झाकून, तोंड मिटून शांत आहेत. त्यांना आपली खुर्ची पूर्ण ५ वर्षे कशी टिकेल याचीच चिंता आहे. यामध्ये श्री. सदानंद गुरव परिवाराची वाताहत झाली तरीही चालणार आहे का? हा प्रश्न विचारण्याची आता वेळ आली आहे. आत्तापर्यंत बातमीचा उगम शोधण्यात व आमचे प्रतिनिधी श्री. योगेश मुळे यांना लक्ष्य करण्यात ते आपला अमुल्य वेळ वाया घालवत आहेत. लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाने ग्रामपंचायतीच्या अन्याय्य कारभारावर प्रशासनाचे लक्ष वेधणे हा गुन्हा आहे का? समाजातील सुशिक्षित व प्रतिष्ठित म्हणवणाऱ्या वर्गाने गरिबांची पिळवणूक करू नये यासाठी चौथा स्तंभ प्रयत्न करत असेल तर तो गुन्हा आहे का?