
चिपळूण : चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या शाखा अंतर्गत प्रीमिअर लीग क्रिकेट स्पर्धेत पहिल्या गटात पश्चिम विभाग तर दुसऱ्या गटात वाशिष्ठी इलेव्हनने विजेतेपद पटकावले. या विजेत्या संघासह उपविजेते संघ व वैयक्तिक बक्षिसे मिळवणाऱ्या खेळाडूंना संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांच्यासह संचालक मंडळ व अन्य मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
चिपळूण नगर परिषदेच्या पवन तलाव मैदानावर दोन दिवस प्रकाशझोतात झाली.
या स्पर्धेचे उद्घाटन संस्थेचे संस्थापक चेअरमन सुभाषराव चव्हाण यांच्यासह संचालक मंडळ व मान्यवरांच्या हस्ते झाले. चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे दरवर्षी चिपळूण शाखानंतर्गत क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात येते. यावर्षीदेखील ३० एप्रिल व १ मे रोजी येथील पवन तलाव मैदानात चिपळूण नागरी प्रीमिअर लीग क्रिकेट स्पर्धा क्रीडा रसिकांच्या उपस्थित पार पडली.
ही स्पर्धा दोन गटात खेळविण्यात आली. दुसऱ्या गटात प्रदर्शनिय सामना चिपळूण नागरी परिवार व पत्रकार इलेव्हन यांच्यात झाला. हा सामना चिपळूण नागरी परिवाराने जिंकला. पहिल्या गटातील अंतिम सामना पश्चिम विभाग व डायमंड इलेव्हन यांच्यात झाला. पश्चिम विभागाने प्रथम फलंदाजी करताना ७६ धावा केल्या. तर डायमंड इलेव्हन संघ अवघ्या ५३ धावा करू शकला. यामुळे पश्चिम विभाग या संघाने पहिल्या गटात विजेतेपद पटकावले. तर दुसऱ्या गटात चिपळूण रायझर व वाशिष्टी इलेव्हन यांच्यात सामना झाला. हा सामना वाशिष्ठी इलेव्हन संघाने जिंकत दुसऱ्या गटात विजेतेपद पटकावले. यामुळे डायमंड इलेव्हन व चिपळूण रायझर या दोन्ही संघाना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. या सर्व विजेत्या उपविजेत्या संघांना चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांच्यासह संचालक मंडळ अन्य मान्यवरांच्या हस्ते आकर्षक चषक देऊन गौरवण्यात आले.
पहिल्या गटात मॅन ऑफ द मॅच, उत्कृष्ट गोलंदाज- सुहास कडव, उत्कृष्ट फलंदाज- आदित्य माळी (पश्चिम विभाग), मॅन ऑफ द सिरीज- शैलेश शिर्के ( डायमंड इलेव्हन) तर दुसऱ्या गटात मॅन ऑफ द मॅच, उत्कृष्ट फलंदाज, मॅन ऑफ द सिरीज- किरण चाळके ( वाशिष्टी इलेव्हन ) उत्कृष्ट गोलंदाज विजय गजमल या सर्व खेळाडूंना सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले.
यावेळी वाशिष्टी डेअरीचे संचालक- उद्योजक प्रशांत यादव, व्हाईस चेअरमन सूर्यकांत खेतले, संचालिका सौ. स्मिताताई चव्हाण, ऍड. नयना पवार, संचालक अशोकराव कदम, राजेश वाजे, सोमा गुडेकर, सत्यवान मामुनकर, गुलाब सुर्वे, रवींद्र भोसले, राजेंद्र पटवर्धन, सर्व पत्रकार आदी उपस्थित होते.
या स्पर्धेला उद्योजक शशांक पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष जयद्रथ खताते, चिपळूण शहराध्यक्ष मिलिंद कापडी, माजी नगराध्यक्ष सुरेखा खेराडे, माजी नगरसेवक परिमल भोसले, प्रकाश साळवी, प्रमोद साळवी,अनिल उपळेकर, बशीर सय्यद, विलास सावंत, ओंकार भिडे, सुधीर गवंडे, मदन शिंदे, बाबा डोंगरे, प्रकाश पत्की आदींनी सदिच्छा भेट दिली.
या स्पर्धेचे यशस्वी व नीटनेटके नियोजन संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. स्वप्ना यादव यांनी केले. ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी संस्थेचे अन्य अधिकारी व कर्मचारी वर्गाने मेहनत घेतली.