
मुंबई- गेल्या काही दिवसांपासून राज्यातील वातावरणात मोठा बदल पाहायला मिळत आहे. कधी कडाक्याचं ऊन तर कधी वादळी वाऱ्यासह जोरदार गारपीट होत आहे. महिन्याभरापासून महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये अवकाळी पावसाने धुमाकूळ घातल्यानंतर आता राज्यातील वातावरण बदललं आहे. अनेक जिल्ह्यांच्या तापमानात वाढ होत असल्याने नागरिकांना उष्णतेचा सामना करावा लागत आहे
पुढील २ दिवस राज्यातील बहुतांश भागात कमाल तापमानाचा पारा सरासरीपेक्षा २ ते ३ अंशांनी वाढणार असल्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे. हवामान विभागाने (IMD) मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड आणि महाराष्ट्रातील कोकण विभागातील शेजारील जिल्ह्यांसाठी उष्णतेच्या लाटेचा इशारा जारी केला आहे. या महिन्यात प्रथमच आणि या मोसमात चौथ्यांदा मुंबईसाठी उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.
गेल्या आठवडाभराच्या तुलनेत आज राज्यातील तापमान मोठी वाढ झाली. गुरुवारी महाराष्ट्रातील तब्बल ११ जिल्ह्यांमध्ये सरासरी ४० अंशांपेक्षा जास्त तापमानाची नोंद झाली. ठाणे-बेलापूर वेधशाळेतही ३९.९ अंशांची नोंद करण्यात आली. मुंबईतही आज तापमानात वाढ झाली. IMD च्या सांताक्रूझ वेधशाळेने मुंबईतील सरासरी तापमान ३६.९ अंश नोंदवले, जे गेल्या २४ तासांत तीन अंशांनी वाढले आहे. दुसरीकडे कुलाबा वेधशाळेतही ३४.२ अंश तापमानाची नोंद झाली. पुढील दोन दिवस अशीच परिस्थिती राहिल, त्यानंतर १३ एप्रिलपासून तापमान कमी होईल, असं हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे.
मोचा चक्रीवादळामुळे तापमानात मोठे फेरबदल होत असल्याचं हवामान तज्ज्ञांनी म्हटलं आहे. मुंबई, कोकण विभागाबरोबरच, महाराष्ट्राच्या अंतर्गत भागातही सातत्याने उच्च तापमानाची नोंद होत आहे. जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांमध्ये आता सातत्याने ४० अंशांपेक्षा जास्त तापमान नोंदवले जात आहे, असं हवामान शास्त्रज्ञ सुषमा नायर यांनी सांगितले आहे. दरम्यान, मुंबईसह कोकण भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आल्यानंतर नागरिकांना काळजी घ्यायचे आवाहन करण्यात आले आहे. याशिवाय जास्तीत जास्त पाणी प्या आणि दुपारचा प्रवास टाळा, असंही आरोग्य तज्ज्ञांनी म्हटलं आहे. दरम्यान, सांताक्रूझ आणि कुलाबा वेधशाळांमध्ये गुरुवारी रात्रीचे तापमान २८ आणि २७.५ अंश नोंदवले गेले, तर मुंबईची आर्द्रता ७२ टक्के होती.