
मुंबई- राज्यात उन्हाळ्याने कहर केला आहे. खान्देश, पूर्व विदर्भ आणि मराठवाड्यात बहुतांश भागात पारा ४५ अंशांपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे आपल्या आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. वाढत्या तापमानामुळे आजारपणं वाढली आहेत. उन्हात फिरल्यामुळे अनेकांना उष्माघाताचा त्रास होत आहे. हवामान विभागाने राज्यात चौथ्यांदा उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. दरम्यान, राज्यात उष्माघातामुळे आतापर्यंत चार जणांचे बळी गेले आहेत.
बंगालच्या उपसागरातील मोचा हे चक्रीवादळ बांग्लादेश आणि म्यानमारच्या दिशेने सरकल्यामुळे पश्चिमेकडून येणाऱ्या वाऱ्यांवर याचा परिणाम झाला आहे. त्यामुळे राज्यावर उष्णतेच्या लाटा धडकत आहेत. पुढील चार ते पाच दिवस हा तडाखा बसेल अशी शक्यता आहे. जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील नम्रता चौधरी आणि अमळनेर तालुक्यातील रुपाली राजपूत या दोन महिलांचा बळी गेलाय. तर नांदेडमध्ये विशाल मादास्वार या युवकानं आपले प्राण गमावले आहेत.
नाशिकच्या जिल्ह्यातील साकोरा गावच्या भिमाबाई हिरे या 70 वर्षीय वृद्ध महिलेचा उष्माघातनं मृत्यू झाला आहे. मृतांचा आकडा चारवर पोहोचला आहे. जळगाव आणि नाशिक जिल्ह्यात गेल्या पाच दिवसापासून तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. राज्यभरात सूर्याचा प्रकोप पाहायला मिळत आहे. बहुतांश शहरांमध्ये पारा चाळिशीपार पोहोचतोय. उत्तर मध्य महाराष्ट्र आणि कोकणाच्या काही भागात उष्णतेच्या लाटेची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे येथील तापमानात चांगली वाढ होणार आहे. आधीच उष्णतेचा कहर रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यात पाहायला मिळत आहे.