
काँग्रेसने ९० च्या दशकात देशात अस्थिरता आणण्यासाठी आघाड्यांची सरकार स्थापन केली आणि बिघडवली सुद्धा
देशात स्थिर आणि मजबूत सरकार असल्याने जगाचा भारतावर विश्वास वाढला आहे. आम्ही विरोधी पक्षात असताना सकारात्मक राजकारण केलं. कधीही नकारात्मक राजकारणाचा रस्ता धरला नाही. विरोधात राहून सरकारचे घोटाळे समोर आणले. पण, सरकारचा विरोध करण्यासाठी विदेशी मदत आम्ही घेतली नाही, असा हल्लाबोल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर केला आहे. पंतप्रधान मोदी ‘एनडीए’च्या बैठकीत बोलत होते.
“राष्ट्रीय लोकशाही आघाडीबरोबर ( एनडीए ) जोडलेल्या नवीन मित्रांचं मी स्वागत करतो. आपला देश येणाऱ्या २५ वर्षात मोठ्या लक्ष्याकडे पाऊल टाकत आहे. हे लक्ष्य विकसित आणि आत्मनिर्भर भारताचे आहे. कोट्यावधी भारतीय नव्या संकल्पनेच्या उर्जेने भरलेले आहेत. पुढील २५ वर्षाच्या कालखंडात ‘एनडीए’ची भूमिका महत्वाची असेल,” असं पंतप्रधान मोदी यांनी सांगितलं.
“देशातील गरीब, मध्यमवर्ग, तरुण, महिला, दलित, पीडित, आदिवासी यांचा विश्वास ‘एनडीए’वर आहे. आपला संकल्प, कार्यक्रम, भावना आणि रस्ताही सकारात्मक आहे,” असं मोदी यांनी म्हटलं.
“सरकार बहुमताने स्थापन होते. पण, देश सर्वांच्या प्रयत्नातून चालत असतो. त्यामुळे विकसित भारताच्या निर्माणासाठी आपण काम करत आहे. देशात राजकीय आघाड्यांची परंपरा राहिली आहे. काँग्रेसने ९० च्या दशकात देशात अस्थिरता आणण्यासाठी आघाड्यांची सरकार स्थापन केली. काँग्रेसने सरकारे बनवली आणि बिघडवली सुद्धा,” अशी टीका नरेंद्र मोदी यांनी केली आहे.