पालकमंंत्री उदय सामंत यांच्याहस्ते देवरूखात विविध विकासकामांचे भूमीपूजन व उद्घाटन…
जनशक्तीचा दबाव न्यूज | मे ०१, २०२३.
प्रतिनिधी : श्री. निलेश जाधव | देवरूख.
देवरूख शहर हे संगमेश्वर तालुक्यातील सुंदर शहर आहे. देवरूख नगरपंंचायतीला शहर सौंदर्यकरण स्पर्धेमध्ये राज्यात नगरपंचायत विभागात द्वितीय क्रमांक मिळाला आहे. हा पुरस्कार नगरपंंचायतीला मिळाल्यामुळे देवरूख शहरवासियांसाठी ही बाब नक्कीच अभिमानास्पद अशीच आहे. नगरपंचायतमधील सत्ताधारी विकासात्मक कामे करून देवरूख शहराचा विकास करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. चांगल्या कामाच्या पाठीशी ठामपणे उभे राहणे हे राज्यकर्ता म्हणून आपले काम असून देवरूख शहराच्या विकासासाठी आपण कटीबध्द असल्याचे प्रतिपादन राज्याचे उद्योगमंत्री व रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंंत्री उदय सामंत यांनी देवरूख येथे आज रविवारी केले.
देवरूख नगरपंंचायतीच्या वतीने आज रविवारी विविध विकासकामांचे भूमीपूजन व उद्घाटन पालकमंंत्री उदय सामंत यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी देवरूख नगरपंंचायतीच्या हाँलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या सत्कार सोहळ्यात पालकमंंत्री उदय सामंत बोलत होते. नगराध्यक्षा मृणाल शेट्ये यांच्याहस्ते पालकमंंत्री उदय सामंत यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना पालकमंंत्री उदय सामंत म्हणाले कि, शिंदे-फडणवीस सरकार विकासाच्या पाठीशी उभे राहणारे असून विकासात्मक कामे दर्जेदार व्हावीत जेणेकरून जनतेला त्याचा फायदा झाला पाहिजे. देवरूख नगरपंंचायतीच्या माध्यमातून शहरात चांगल्याप्रकारे विकासात्मक कामे झाली आहेत. याचे आपल्याला समाधान आहे.
संगमेश्वर तालुक्यात छत्रपती संभाजी महाराजांचे भव्यदिव्य स्मारक होणार असून हे स्मारक दिपस्तंभासारखे ठरावे. रत्नागिरीत शासकिय अभियांत्रिकी महाविद्यालय व वैद्यकीय महाविद्यालय सुरू होत असून रत्नागिरी जिल्हा शैक्षणिक हब बनत असल्याने आनंद होत आहे. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेतून महिला बचत गटातील महिलांसाठी उद्योगासाठी चांगल्याप्रकारे सबसिडी देवून तब्बल ५० लाखांपर्यंत कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याचा फायदा महिला सबलीकरणासाठी होणार आहे. यासाठी महिलांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे.
मार्लेश्वर तीर्थक्षेत्राच्या सुशोभिकरणासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचेही पालकमंंत्री श्री. सामंत म्हणाले. कोकणात रिफायनरी प्रकल्प झाला तर कोकणात विकासात्मक क्रांती होवून कोकणचा कायापालट होईल. असेही त्यांनी शेवटी म्हटले. यावेळी माजी आमदार प्रमोद जठार, देवरूख नगराध्यक्षा मृणाल शेट्ये, उपनगराध्यक्ष वैभव कदम, मुख्याधिकारी चेतन विसपुते, गटविकास अधिकारी भरत चौगले, नायब तहसिलदार क्षीरसागर, नगरसेवक वैभव पवार, नगरसेविका रेश्मा किर्वे, भाजपचे तालुकाध्यक्ष प्रमोद अधटराव, शिवसेनेचे तालुकाप्रमुख प्रमोद पवार, उपजिल्हाप्रमुख राजेश मुकादम, माजी उपनगराध्यक्ष अभिजित शेट्ये आदि उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रमोद अधटराव यांनी केले तर सूत्रसंचालन भाजपचे देवरूख शहराध्यक्ष सुशांत मुळ्ये यांनी केले.