
मोठमोठ्या खिडक्या आणि पारदर्शक छप्पर असलेले व्हिस्टाडोम कोच प्रवाशांमध्ये लोकप्रिय झाले आहेत. प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेऊन आता मध्य रेल्वेने सीएसएमटी-करमाळी तेजस एक्स्प्रेसला आणखी एक व्हिस्टाडोम कोच जोडण्याचा निर्णय घेतला आहे. सीएसएमटी-करमाळी तेजस एक्स्प्रेसला आता १४ एप्रिलपासून अतिरिक्त व्हिस्टाडोम डबा जोडण्यात येणार आहे.
मोठ्या खिडक्या आणि पारदर्शक छत असलेले हे डबे मुंबई ते पुणे आणि गोवा रेल्वे विभागातील प्रवाशांमध्ये लोकप्रिय झाले आहेत. कोकणात जाताना लागणारे धबधबे , नद्या, दऱ्या, बोगदे, हिरवीगार शेतं यांचे विहंगम दृश्य व्हिस्टाडोममधून बघत प्रवास करणे लोकांच्या जास्त पसंतीस उतरले आहेत. त्यामुळेच तेजसला व्हिस्टाडोमचा अतिरिक्त डबा लावण्याची मागणी वाढली होती.
गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये मुंबई-करमाळी तेजस एक्स्प्रेसमध्ये व्हिस्टाडोम कोच जोडण्यात आला होता. आता अतिरिक्त व्हिस्टाडोम कोच जोडल्यामुळे, असे दोन डबे असणारी ही देशातील पहिली ट्रेन ठरेल, असे मध्य रेल्वेने म्हटले आहे. या बदलानंतर तेजस एक्स्प्रेसमध्ये दोन विस्टाडोम कोच, ११ एसी चेअर कार, एक एसी एक्झिक्युटिव्ह चेअर कार कोच आणि दोन लगेज कोच आणि एक जनरेटर-कम-ब्रेक व्हॅन अशी रचना असेल.
मध्य रेल्वेने २०१८ मध्ये मुंबई-मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेसमध्ये पहिल्यांदा विस्टाडोम कोच जोडला . प्रवाशांची प्रचंड मागणी लक्षात घेऊन १५ सप्टेंबर २०२२ रोजी मध्य रेल्वेने मुंबई-मडगाव मार्गावर धावणाऱ्या तेजस एक्स्प्रेसमध्ये दुसरा विस्टाडोम जोडला. विस्टाडोम डब्यांना मिळालेल्या भरघोस प्रतिसादामुळे मुंबई-पुणे डेक्कन एक्स्प्रेसमध्ये हा डबा जोडण्यात आला. त्यानंतर डेक्कन क्वीन, प्रगती एक्स्प्रेस ,पुणे-सिकंदराबाद शताब्दी एक्स्प्रेसमध्ये विस्टाडोम कोच सुरू करण्यात आला.