डोंबिवली : येथील पूर्व भागातील गोळवली जवळील रिजन्सी इस्टेट गृहसंकुलात मागील दहा दिवसांपासून कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याने रहिवाशी संतप्त झाले आहेत. एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना, स्थानिक आ. प्रमोद पाटील यांनी पुढाकार घेऊनही संकुलातील पाणी टंचाईचा प्रश्न मार्गी लागत नसल्याने रहिवाशांनी येत्या दोन दिवसात एमआयडीसीवर मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे.
रिजन्सी इस्टेट गृहसंकुलाचा पाणी पुरवठा नियमित दाबाने करण्यात यावा म्हणून रिजन्सी इस्टेट गृहसंकुलाचे पदाधिकारी चंद्रहास चौधरी यांनी एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता यांना गेल्या आठवड्यात पत्र दिले आहे. या पत्रावर कार्यवाही होत नसल्याने रहिवाशी संतप्त झाले आहेत. एमआयडीसी पुरेशा दाबाने पाणी पुरवठ्यासंदर्भात उदासीन असल्याने रहिवाशांनी एमआयडीसीवर मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे.
पाणी टंचाईमुळे रहिवाशांना दररोज खासगी टँकरमधील पाणी विकत घेऊन पाण्याची तहान भागवावी लागते. घरात कपडे, धुणी, स्वच्छतागृह वापरासाठी टँकरच्या पाण्याचा वापर केला जातो. पिण्याच्या पाण्यासाठी बाजारातून बाटला विकत आणावा लागतो. हा फुकटचा भुर्दंड पाणी टंचाईमुळे संकुलाला बसत आहे, असे रहिवाशांनी सांगितले.